पुणे : देशाच्या रक्षणार्थ लढणा-या सैनिक व त्यांच्या कुटुंबाकडे मोठया प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यामध्ये अगदी खेडोपाडयांपर्यंत सैनिकांची घरे व कुटुंब वास्त्यव्यास आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आस्था दाखवून त्यांची विचारपूस होण्याकरीता वेगळ्या प्रकारचे कार्य उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी सैनिक बोर्डाच्या सहाय्याने प्रत्येक गावात सैनिक कुटुंबियांसाठी एक प्रतिनिधी निर्माण व्हायला हवा. तरच सैनिक व कुटुंबियांची खरी परिस्थिती समाज व सरकारसमोर येऊ शकेल, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सतिश नवाथे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊन आणि सैनिक मित्र परिवारच्यावतीने सदाशिव पेठेतील नारद व्यास मंदिरात भाऊबीजेनिमित्त शहीद व बेपत्ता जवानांच्या वीरपत्नींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारद व्यास मंदिराचे ह.भ.प. मकरंदबुवा औरंगाबादकर, अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, रोटरीचे अभिजीत म्हसकर, निंबाळकर तालीम मंडळाचे सुरेश पवार, विष्णु ठाकूर, राजू पाटसकर, शिल्पा पुंडे, स्वाती ओतारी, कल्याणी सराफ, जयश्री देशपांडे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 18 वे वर्ष होते.
मकरंदबुवा औरंगाबादकर म्हणाले, देशाच्या सिमेवर जवान लढतात ते त्यांच्या घरातील स्त्रियांच्या बळावर. त्या सैनिकाची आई, पत्नी, बहिण त्याच्यामागे खंबीरपणे उभी असते. आपण केवळ आपल्या घरासाठी नाही, तर देशासाठी लढतोय ही भावना या सैनिकांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्या मागे उभे राहणा-या या भारतीय स्त्रियांना सलाम करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. अभिजीत म्हसकर म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे देशासाठी योगदान देतात, त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांसाठी योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे. त्या कुटुंबांसाठी केलेल्या कामातून देशाप्रती कार्य केल्याचे समाधान मिळते, असेही ते म्हणाले. विश्वलीला ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ, पूना गेस्ट हाऊस यांसह अनेक संस्थांनी उपक्रमाला सहकार्य केले. अशोक मेहेंदळे यांनी स्वागत केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.
भारत-चीन युद्ध (1962), भारत-पाकिस्तान युद्ध (1965), भारत-बांग्लादेश युद्ध (1971), आॅपरेशन नागालँड (1985 व 1993), कारगिल युद्ध (1999) मध्ये शहीद व बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सुमन जीमन, चंद्रभागा पवार, द्रोपदाबाई पाटील, यशोदाबाई सवाखंडे, मालतीबाई जगताप, शशिकला मोरे, लक्ष्मीबाई गोरे, मधुरा जठार, ताराबाई म्हस्के, अवंतीबाई मोरे, कलावती जाधव, महानंदा बनसोडे, लक्ष्मीदेवी साठे, निलम शिळीमकर आदींचा सन्मान करण्यात आला. दिवाळी फराळ, तिरंगी उपरणे, आकाशकंदील व भेटवस्तू देण्यात आल्या.