पुणे – सैनिक माझे नाव, भारत माझे गाव असे म्हणत देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या आणि वेळप्रसंगी देशासाठी प्राण अर्पण करणा-या सैनिकांच्या कुटुंबियांना भारत माता की जय… च्या जयघोषात व सनई- चौघडयाच्या निनादात कसबा गणपती मंदिराच्या परिसरात मानवंदना देण्यात आली. रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि थरथरत्या हातांनी ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी केलेला सलाम असे देशप्रेमाने भारलेले वातावरणात पाहताना वीरमातेला देखील अश्रू अनावर झाले.
सैनिक मित्र परिवारतर्फे भाऊबीजेनिमित्त देशासाठी लढत चेन्नई येथील समुद्रात भारतीय हवाईदलाचे विमान कोसळल्याने बेपत्ता झालेल्या निगडी येथील फ्लाईट आॅफिसर कुणाल बारपट्टे या जवानाच्या वीरमाता विद्याताई बारपट्टे व वीरपिता राजेंद्र बारपट्टे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संपदा सहकारी बँकचे अध्यक्ष विवेक मठकरी, कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, अशोक मेहेंदळे, अॅड. बिपीन पाटोळे, आनंद सराफ, भोला वांजळे, संदीप ढवळे, कल्याणी सराफ, शेखर कोरडे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते. पुण्यातील ११ गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
वीरपिता राजेंद्र बारपट्टे म्हणाले, माझा मुलगा बेपत्ता होऊन कित्येक महिने उलटले तरीही शोध लागलेला नाही. सरकारकडे अशी यंत्रणा नाही, जी समुद्रामध्ये 400 मी खोलीपेक्षा जास्त अंतरावर शोध घेऊ शकेल. सैनिकांच्या जीवाशी खेळणा-या जुन्या विमानांचा वापर बंद करायला हवा. लष्करात 30 वर्षांहून अधिक काळ असलेली जुनी विमाने आहेत. राजकीय फायद्यासाठी सैनिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून लष्करात उत्तमप्रतीची यंत्रणा वापरायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विवेक मठकरी म्हणाले, दुस-याच्या दु:खात स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे सहभागी होणे, हे सुसंस्कृत समाजाची लक्षण आहे. ज्या देशात सैनिकांप्रती सद््भावना असते, तो देश नेहमीच प्रगती पथावर असतो. आनंद सराफ म्हणाले, सैनिक कुटुंबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. आज आम्ही लावलेले दीप जरी अबोल असले, तरीही सामान्य नागरिक म्हणून आमच्या जवान व कुटुंबियांप्रती असलेल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असेही ते म्हणाले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी गीत सादर केले. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. पीयुष शहा यांनी आभार मानले.