पुणे – अंधा-या आयुष्यात चिमुकल्या बोटांनी एकमेकांना मैत्रीचा हात देत प्रकाशवाटा प्रज्वलित करणा-या दृष्टीहिन मुलांसह चेह-यावरील निरागस हावभावांनी आजूबाजूला असलेल्या मित्रांच्या मनातले भाव जाणणा-या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांनी गंमत जत्रेत सहभागी होत गमतीच्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. फेस पेटिंगमधून झालेला स्वत:चाच विदूषकाचा चेहरा आरशामध्ये पाहण्यासोबतच अगदी फोटो कॉर्नरमध्ये मनमोकळे हास्य करीत सेल्फी काढणारे हे विशेष तारे बालदिनी जमिन पर अवतरल्याचा भास होत होता.
लियो क्लब आॅफ पूना नेचर लव्हर्स या संस्थेतर्फे विशेष मुलांना बालदिनाचा आनंद मिळवून देण्याकरीता एपिक कार्निव्हलचे आयोजन स्वारगेटजवळील ओसवाल बंधू कार्यालयात करण्यात आले. यावेळी समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, शाम झंवर, राजकुमार अग्रवाल, कैलाश झंवर, जगदीश अग्रवाल, गोविंद मुंदडा, शाम भुतडा आदी उपस्थित होते. विविध संस्थांमधील ४५० हून अधिक दृष्टीहिन, अपंग, बहुविकलांग, मतिमंद असे दिव्यांग मुले-मुली सहभागी झाले होते.
फेसपेटिंग, हँड प्रिंट वॉल, फोटो बुथ, जादूचे प्रयोग, जंपिंग जॅक, पॉटरी मेकिंग, टॅटू यांसह गमतीचे खेळ, विविध राईडस् आणि करमणुकीचे कार्यक्रम या मुलांकरीता तरुणाईने आयोजित केले होते. त्यामध्ये प्रत्येक संस्थेतील मुलांनी उत्साहने सहभाग घेतला. पॉटरी मेकिंगच्या स्टॉलवर मातीची भांडी बनविण्यासाठी दृष्टीहिन मुलांनी विशेष गर्दी केली. चाकावर फिरणा-या मातीच्या गोळ्याला चिमुकल्या बोटांनी आकार देतानाचा अनोखा स्पर्श त्यांनी अनुभविला.
पुणे आणि परिसरातील पुणे अंधशाळा मुलांची, कोथरुड मुलींची अंधशाळा, आधार मूकबधिर विद्यालय, शिवछत्रपती विद्यालय, जे.आर.तरटे शाळा आदी संस्थांमधील दिव्यांग मुला-मुलींनी बालदिनाचा आनंद लुटला. मुख्य एपिक कार्निव्हल जानेवारीमध्ये होणार असून त्यापूर्वी दिव्यांगांकरीता व्यासपीठ मिळवून देण्याकरीता पुढील दोन महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्लबचे प्रतिक केला, निखील ततार, शुभम मुंदडा, ऐश्वर्या लोणकर, अंकिता मुंदडा, निधी राजगुरु, मोना भट्टी, मानव राठोड यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते.