पुणे – योगातून कर्मात कौशल्य येते, याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे, असे सांगत पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.विकास आबनावे यांनी आॅस्ट्रियामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यायी चिकित्सा पद्धती याविषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. डॉ.आबनावे यांनी भारताचे प्रतिनिधीत्त्व करीत परिषदेत सहभागी झालेल्या ६१ देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांना ओंकार साधना आणि ध्यानाची प्रक्रिया सप्रयोग शिकविली.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांची परिषद युरोपमधील व्हिएन्ना येथे नुकतीच पार पडली. यावेळी भारताकडून डॉ.आबनावे यांच्यासह संयोजन समितीच्या सदस्या जगप्रसिद्ध अॅक्युपंक्चरतज्ज्ञ सुमिता सातारकर, डॉ.जितेंद्र आर्या, प्रथमेश आबनावे आदी सहभागी झाले होते. स्त्रियांच्या वंधत्त्वावर योग आणि निसर्गोपचाराचा उपचार याविषयावर डॉ.आबनावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, योगामधील ध्यान करताना मेंदू पूर्ण सुप्तअवस्थेत जातो. त्यावेळी नवीन चेतापेशी तयार होतात आणि जुन्या पेशींमधील डी.एन.ए. लहान होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबते, असे सांगत हा वैज्ञानिक पुरावा अमेरिकेतील न्युरो स्पेशालिस्ट म्हणून काम करणा-या डॉ.पथिक वधवा यांच्या संशोधनाद्वारे त्यांनी पॉवरपॉईंट प्रझेंटेशनमधून मांडला.
अमेरिका, रशिया,पोलंड, झेकरिपब्लिक, फिलिपिन्स या देशांच्या प्रतिनिधींनी देखील योगाचे महत्त्व जाणून घेत स्वत:चे विचार मांडले. पॅरिस येथे पुढीलवर्षी आयोजित केलेल्या जागतिक परिषदेचे संयोजक आणि प्रमुख वक्ता म्हणून डॉ.आबनावे यांना आमंत्रित करण्यात आले. मोनिका पवार, रुची कुलकर्णी यांनी परिषदेत डॉ.आबनावे यांच्याकडून तांत्रिक बाजू सांभाळली. डॉ.आबनावे यांनी यापूर्वी पाकिस्तान, नेपाळ, रशिया येथे देखील विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.