पुणे – सुदृढ भारताच्या जडणघडणीसाठी मुलांना लहानपणांपासून आरोग्य विषयक साक्षर करायला हवे, आरोग्य संस्कृती रुजवायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अनिल शिरोळे, रोटरी क्लबचे अभय गाडगीळ, डॉ. जयश्री तोडकर, नवनीत प्रकाशनचे सुनील गाला, संदेश गुप्ता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आपली जीवनशैली आणि जेवण शैली या दोन्हीत बदल झाले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना लठ्ठपणाच्या विकाराने घेरले आहे. मात्र समाजात अजूनही लठ्ठपणा हा विकार आहे याबाबत जाणीव जागृती झालेली नाही. फाईट चाईल्डहूड ओबेसिटी या चळवळीमुळे समाजाच्या विविध घटकांत स्थूलपणांबाबत योग्य ती जाणीव जागृती होईल’.
लहान मुलांतील स्थूलपणा ही चिंतेची बाब आहे. यावर तत्काळ कार्य करण्याची आवश्यकता आहे. डॉ. जयश्री तोडकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या चळवळीमुळे याबाबत सुरूवात होत आहे. या चळवळीला राज्य शासन आवश्यक ती मदत देईल. ही चळवळ राज्याच्या सर्व भागात पोहोचण्यासाठी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
स्थूलपणाविरोधातील चळवळीत शाळा आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शाळांमधून स्थूलपणाविरोधारत जाणीव जागृती व्हायला हवी. यासाठी शिक्षकांनी भूमिका बजवायला हवी, अशी अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी वक्तव्य केले.
डॉ. जयश्री तोडकर यांनी स्थूलपणा केवळ शहरातील मुलांतच नव्हे तर ग्रामीण भागातही आढळत आहे. मुलांना पुन्हा एकदा काटक बनायला आपण प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ही मोहीम असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चळवळीचा लोगो, माहितीपट आणि बीएमआय-डायलरचे अनावरण झाले.