पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची “महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या”(टीपीओ) प्रथम अध्यक्षपदी निवड झाली. मुंबईतील खालापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने प्रा. रवंदळे यांची निवड करण्यात आली. राज्यातील 250 अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट ऑफीसर्स आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वृद्धिंगत करून त्यांना सुयोग्य ठिकाणी कॅम्पस मधून नोकरी मिळावी या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. पुढील काळात राज्यातील सर्वंच विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे असोसिएशन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
असोसिएशनच्या कार्यकारी संचालकपदी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे प्रा. संजय धायगुडे, सचिवपदी मुंबईच्या एससीओईचे प्रा. संजय जाधव यांची निवड झाली.
पीसीईटीच्या सेंट्रल ॲण्ड ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे हे गेली अनेक वर्षे प्लेसमेंट च्या कामात अग्रेसर आहेत. मागील कालावधीत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून सुमारे अठरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सुयोग्य ठिकाणी नोकरीची संधी मिळवून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. राज्यातील तसेच देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी अशा संधींचा लाभ घेतला आहे. आगामी काळात हेच काम करत अधिकाधिक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे असोसिएशन विद्यार्थी, महाविद्यालये, प्लेसमेंट ऑफीसर्स या सर्वांनाच लाभदायक ठरणार आहे असे प्रा. रवंदळे म्हणाले.
सध्या प्रा. रवंदळे पीसीईटीसह तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र महाविद्यालयांत सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत आहेत. पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस.डी.गराडे, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. हरिष तिवारी, डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी प्रा. रवंदळे यांचे अभिनंदन केले आहे.