पुणे – भूतकाळात रमण्यात आणि भविष्यकाळाचा विचार करण्यात आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण वाया जातात. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानकाळातील गोष्टींचा आनंद घ्या. माणूस जर वर्तमानकाळ पूर्णपणे जगला तर नक्कीच सुखी होईल, असे सांगत प्रख्यात मार्गदर्शक डॉ. मनिष गुप्ता यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. महेश प्रोफेशनल फोरमच्या एमपीएफ सेंट्रल पुणे आणि पुणे जिल्हा युवा समितीच्यावतीने दिशा २०१७ अंतर्गत डॉ. मनिष गुप्ता यांच्या व्याख्यानाचे आयोजन एरंडवण्यातील कलमाडी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी रमेश तोष्णीवाल, कमलेश जाजू, अमित चांडक, नरेंद्र चांडक, व्यंकटेश बजाज, संतोष जाजू, राकेश लद्दड, अनिकेत राठी उपस्थित होते.
डॉ. मनिष गुप्ता म्हणाले, माणसाच्या आयुष्यातील अनेक क्षण भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्यात हरवून जातात. अशाप्रकारे माणसाचा आजचा दिवस त्याच्या हातातून निसटून जातो आणि अनेक आनंदाचे क्षण तो गमावून बसतो. भूतकाळ आपण पकडून ठेवू शकत नाही आणि भविष्यकाळात आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे माणसाने वर्तमानात आनंदाने जगावे.
ते पुढे म्हणाले, माणूस आपल्या आयुष्यात एवढा गुंतलेला असतो त्यामुळे तो आयुष्य जगायचे विसरून जातो. आपले आयुष्य सुखी होण्यासाठी आपला थोडावेळ आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी द्यायला हवा. तसेच आपला वेळ समाजासाठी देखील देणे गरजेचे आहे. दुस-यांचे आयुष्य आनंदी केल्यास माणूस स्वत: देखील सुखी होऊ शकतो.