पुणे – आम्ही ठाकर ठाकर…जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी…पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले…अशा एकाहून सरस गीतांची श्रवणीय मेजवानी रसिकांनी घेतली. प्रख्यात गायक जितेंद्र अभ्यंकर, आणि राधा मंगेशकर यांच्या सुरेल स्वरातील भावगीत, भक्तीगीत आणि लोकगीतातून अनोख्या स्वरमैफलीचा आनंद रसिकांनी लुटला.
श्रीमोरया गोसावी यांच्या ४५६ व्या समाधी महोत्सवनिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित मोगरा फुलला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित होते.
ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेले काय बाई सांगू, कसं गं सांगू या गीताला रसिकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. जैत रे जैत चित्रपटातील आम्ही ठाकर ठाकर या गीतावर वादनाच्या दमदार सादरीकरणाने रंगत आणली. या नंतर शारद सुंदर चंदेरी राती या भावगीताने रसिकांची विशेष दाद मिळविली.
समाधी सोहळ््यानिमित्त मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित पठण केले. यानंतर भाविकांनी श्रीमोरया गोसावी चरित्र पठण केले. गजानन चिंचवडे आणि आश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. देवस्थानातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन विश्वस्त अॅड. राजेंद्र उमप यांच्या हस्ते झाले. राजू शिवतरे यांनी शिबिराचे संयोजन केले होते.