पुणे – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने 15 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत ‘ग्राहक जनजागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयात जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्यांसोबत ग्राहक संरक्षण विषयासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नितीन उदमले तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती सर्वसामान्यांना करुन देण्यासाठी या पंधरवडयामध्ये विविध विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल लावण्याबरोबरच नवनविन उपक्रम राबवावेत. या उपक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्राहक पंचायत यांचा सहभाग घ्यावा. जेणेकरुन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती पोहोचून ग्राहक सुजाण होईल. तसेच ग्राहक जनजागृतीपर घडीपत्रिका, पत्रके वाटप करणे, पथनाटय, भारुड, ग्राहक दिंडीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काची माहिती देण्यात यावी. या सर्व कार्यक्रमांचा अहवाल राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीला पाठविण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.