पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्यासारखे वीरयोध्दे प्रत्येक सैनिकाचे स्फूर्तीस्थान आहेत. ज्यांच्या लढायांचे, जीवनाचे अध्ययन आज देखील अनेक ठिकाणी केले जाते. या योध्दांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी दाखविलेल्या पराक्रमामुळे नेहमीच प्रेरणा मिळते. त्यामुळे वीरयोद्धे हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे कीर्तन महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात ह. भ. प. श्रीपादबुवा ढोले यांना विनायक पाटणकर यांच्या हस्ते कीर्तन कोविद ह. भ. प. स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ, शाहीर हेमंतराजे मावळे, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे उपस्थित होते.
विनायक पाटणकर म्हणाले, इंग्लंडमध्ये अजूनही बाजीराव पेशवे यांच्या युध्दांचे अध्ययन केले जाते. या योद्धयांचे कार्य इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक व्यक्ती, संस्था करीत आहेत. कीर्तनकार आणि शाहिर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांची महती समाजापर्यंत पोहोचवित असतात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी चारुदत्त आफळे यांनी कीर्तनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सांगताना म्हणाले, बाबासाहेबांना लहान वयातच उच्च-नीचतेचा चटका बसला. त्यावेळीच त्यांनी समाजातील हा जातीभेद नष्ट करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर विरोधाला सामोरे जावे लागतेच हे बाबासाहेबांना माहिती होते. परंतु त्यांनी हार न मानता समाजातील भेदभाव नष्ट केला. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेले समता, एकता, बंधुभाव हे विचार लक्षात ठेवावे. त्यांनी सांगितलेल्या विचारांवर आयुष्य जगलो तर हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सूत्रसंचालन केले. ह. भ. प. पुष्करबुवा औरंगाबादकर यांनी आभार मानले.