पुणे – “ गाव व समाजाच्या विकासासाठी सरपंचांनो, थोड्या फार प्रमाणात चांगले राजकारणी बना. त्याच प्रमाणे आपले गाव हे दलाल मुक्त करा.” असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे मॉडेल व्हिलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पहिल्या सरपंच संसदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नैसर्गिक शेतीचे प्रणेते व सुप्रसिध्द कृषीतज्ञ पद्यश्री श्री. सुभाष पाळेकर हे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भूगर्भ जल सर्वेक्षण आणि विकास समितीचे संचालक शेखर गायकवाड, नेदरलॅड येथील मारगॉट ट्रिबेल्स हे सन्माननीय अतिथी म्हणून उपिस्थत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड , डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील, कुलसचिव प्रा. डी.पी.आपटे व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे ही उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले,“ भविष्यात पंचायतीचे कार्य हे कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात जाईल की काय, अशी भीती वाटते. त्यामुळे सरपंचांनी विरोधकांना ऑडिटर म्हणून पहावे व विकास कार्यवर जोर द्यावा. त्यासाठी निर्व्यसनी बना, उत्तम आरोग्य ठेवा आणि गावाची मानसिकता तपासून कार्य करा. कार्य केले नाही, तर सरपंचांच्या हातातून सर्व अधिकार काढले जातील. त्यामुळे सरकारी पैसा आणि लोकसहभागातून चांगले कार्य करावे. आपल्या गावाला भरपूर पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती बरोबरच शाश्वत आनंद देणारे बनवावे. विकास करतांना बदल स्वीकारा आणि जुन्याचा समन्वय साधा. ”
“राज्यात ८२ टक्के शेतकरी हा पावसावर अवलंबून आहे. अशा वेळेस आपल्या येथे जलसंधारणाची कामे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण त्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे आम्हाला दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. चांगले कार्य करतांना संघर्ष होतात, हे सदैव लक्षात ठेवा. सरपंचांनी असे कार्य करावे की गावात चावडीचे मंदीर व्हावे.”
शेखर गायकवाड म्हणाले,“आर्थिक स्त्रोत वाढवून सरपंचांनी गावाचा विकास करावा. काम करताना शक्यतो चूक होऊ देऊ नये. २१व्या शतकात आधुनिक विचारांच्या सरपंचांची गरज आहे. त्या माध्यमातून त्यांने गावाची संकल्पना बदलून सुंदर व प्रगत गाव पुढच्या पिढीला दयावे. आपले गावं हे ब्रॅड एम्बेसिडेर होण्याच्या दृष्टीने कार्य करावे.”
मधुकर भावे म्हणाले,“ अजूनही गावा-गावात भारतीय संस्कृती टिकली आहे. त्याचा र्हास होवू देऊ नये. त्याच प्रमाणे सरपंचांनी प्रत्येक कार्य करतांना सकारात्मक विचारधारणा ठेऊन कार्य केल्यास ते यशस्वी होते. गोंदिया ते गुहागर येथील सरपंचांनी सामाजिक कार्यासाठी समरसून काम करावे.”
पद्मश्री सुभाष पाळेकर म्हणाले,“ज्या दिवशी गावतला पैसा गावातच राहील, त्या दिवशीच शंभर टक्के ग्राम स्वराज्य निर्माण झाले, असे होईल. ग्रामविकासासाठी प्रत्येक गाव हे आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हावयास हवे. ग्रामविकासाची संकल्पना बदलण्यासाठी सरपंचांच्या खांद्यावर मोठी जवाबदारी आहे. विकास माणसाला सुखी करीत नाही. त्यामुळे विकासाच्या मागे न लागता शेतीला समृद्ध करा. त्यासाठी देशी गाय आणि नैसर्गिक शेती करावी. वृद्धाश्रमात आईला पाठवू नका आणि काळी आई म्हणजे आपल्या शेतीचा र्हास करू नका. आई, काळी आई आणि गाय यांचा सन्मान करा.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सामाजिक कार्यात पदोपदी तुम्हाला अपमान होईल. ते सहन केल्यावरच विकासाला नवी दिशा मिळते. भारतीय संस्कृतीचे दर्शन परंपरा आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून दिसते. आम्हाला सद्गुणांची पूजा करायची आहे. माणसा माणसातील संवाद वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवा. मानवजातीच्या कल्याणसाठी विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय होणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदानी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारतमाता ही ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ संपूर्ण राज्यातून आलेल्या सरपंचांच्या उपस्थितीमुळे ही संसद यशस्वी झाली आहे. पुढील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात व अधिक चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सरपंच संसद भरविली जाईल. त्यातील वक्ते सुद्धा अधिक योग्यतेचे असतील. पण येथून जातांना या सरपंचांमध्ये गुणात्मक फरक झालेला असावा व त्यांनी येथील शिदोरीचा उपयोग ग्रामविकासासाठी करावा.”
पहिल्या सरपंच संसद मध्ये संपूर्ण राज्यातील उपस्थित १२०० सरपंचांनी यावेळेस विकास कार्याची शपथ घेतली. या संसदेत मांडलेल्या ठरावांना राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या संसदेत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, नागपूर विभाग, अमरावती विभाग, कोकण क्षेत्रातील निवडक सरपंचांनी भाग घेतला होता.