पुणे – स्वच्छ शहर सुंदर शहर…पाण्याचे नियोजन काळाची गरज…शहरीकरण शाप की वरदान.. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन…घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करीत शालेय विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. अप्रतिम अभिनय आणि संवादातून समाजातील विविध प्रश्नांवर अतिशय प्रभावी सादरीकरण करीत विद्यार्थ्यांनी स्वत:मधील सामाजिक जाणीवा एकांकिकेतून उलगडल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स, जय नाटक कंपनी आणि उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमध्ये एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी इंद्रधनुष्य सभागृह येथे पार पडली. पुणे शहरांतील विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. नवनाथ भारती, संदीप विश्वासराव, जतीन इनामदार, आम्रपाली बरसगाडे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.
स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सर्वोकृष्ट एकांकिका रुपये २५ हजार, द्वितीय क्रमांक २० हजार, तृतीय क्रमांक १५ हजार आणि चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोकृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांकरीता रोख स्वरुपातील पारितोषिके असणार आहेत. पर्यावरण मित्र शाळा म्हणून तीन विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी फेस्टिव्हल पुण्यासह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.