पुणे – महाराष्ट्रामध्ये भगवान गणेशाची उपासना मोठया प्रमाणात केली जाते. लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी गणेशपूजेला प्रोत्साहन दिले. देशातील इतर प्रांतांमध्ये देखील आता गणेशपूजा मोठया प्रमाणात होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सण शास्त्रीय अनुष्ठानानुसार साजरे होत नाहीत. दिपावलीमध्ये वाढणा-या प्रदूषणाने वातावरण मलिन होत आहे. त्यामुळे शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करीत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्याकरीता सज्जनांची संघटनशक्ती होणे आवश्यक आहे. ईश्वर, धर्म आणि संघटनशक्ती हेच अस्तित्वरक्षणाचे योग्य मार्ग आहेत, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे प.पू. श्री मज्जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशिर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त उपस्थित होते. प्रदीर्घ कालावधीनंतर जगन्नाथ पुरी पीठाचे प.पू. श्री मज्जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज स्वामी हे पुण्यामध्ये आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मंदिरामध्ये शंकराचार्यांच्या हस्ते श्रीं ना महाभिषेक, प्रवचनासह आरती देखील करण्यात आली.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, कलियुगात विनायकाची आणि चंडीची पूजा होणे आवश्यक आहे. गणांचे नायक, अधिपती श्रीगणेश असल्याने त्यांची शीघ्र सकल आराधना केल्यास प्रत्येकाला यश मिळेल. हाताला ज्याप्रमाणे पाच बोटे आहेत. त्याप्रमाणे परमात्मा पाच रुपांमध्ये स्थापित झाले आहेत. ब्रह्मा, विष्णु, शिव, शक्ती आणि गणपती. या सर्व देवांचे मौलिक स्वरुप सच्चिदानंद सर्वेश्वर आहेत.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास आदींनी कर्मकांडाला विरोध करीत ज्ञानाच्या दृष्टीने प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी आणि दासबोधासारखे ग्रंथ आपल्याला त्यामुळेच मिळाले. आजच्या महायांत्रिक युगात वैदीक शास्त्राचा आधार न घेता देशात आणि देशाबाहेर जे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांचे सर्व प्रयोग व्यर्थ आहेत. आधुनिक विज्ञान प्रयोगांना शास्त्रसंगती असणे अत्यंत आवश्यक आहेत, असेही त्यांनी सांगितले.