टिम “येवा कोकणात”
देवगड तालुक्यातील सर्वात देखणा किनारा म्हणून मिठबांव तांबळडेगचा उल्लेख होतो. या सौंदर्याला चारचाँद लावले ते अन्नपूर्णा नदीने. शिरगावला उगम झालेली २१.७ कि. मी. धाव घेत या मिठबाच्या किना-यावर अन्नपूर्णा अरबीसुमद्राला विलीन होते. गोडे पाणी खारे होऊन जाते. परंतु, येताना ती अनेक गावांची तहान भागवत अनेक देवतांच्या परिसरात समृद्धी पसरवत पुढे रवाना होते. ही अन्नपूर्णाची गती समुद्र पाहताच शांत होते आणि ती हळूहळू वाळूतून सरकू लागते. मिठबांवला पर्यटन प्रकल्प मंजूर आहे. येथे पंचतारांकित हॉटेल करण्यासाठी ताज ग्रुपने जागा घेतली. मात्र, अद्याप हा परिसर विकसित करण्यात आलेला नाही. पर्यटनदृष्टय़ा मिठबाव, कातवण, कुणकेश्वर हा परिसर विकसित होत आहे. मिठबाव खाडीच्या किना-यावर असलेल्या डोंगरावरच कुणकेश्वराचे पर्यटन संकुल उभे राहत आहे. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. अन्नपूर्णा आपल्या कुशीत या कासवांना घेऊन विसावते. येथे या कासवांना गोडय़ा आणि खा-या पाण्याची एकाच वेळी चव चाखता येते. मिठबांव हे गाव सर्वसमृद्ध गाव म्हणून ओळखले जाते. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, तांबळडेग समुद्रकिनारा आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक खासगी वाहनांनी दाखल होत असतात. येथील गजबादेवी मंदिर, मिठबांव तांबळडेग समुद्रकिनारा आदी ठिकाणांना पर्यटक पसंती देतात. अलीकडे मराठी चित्रपट आणि बॉलिवुडचे अनेक कलावंत या किना-यावर दाखल होत आहेत. आतापर्यंत पंधराहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण या किना-यावर झाले आहे. शेतकरी, बागायतदार, सामान्य माणूस या सर्वानाच सुखी करणारी अन्नपूर्णा सौंदर्यातही तेवढीच खुलते. मिठबांवच्या समुद्रकिनारी वसलेले गजबादेवी मंदिर हे त्यापैकीच ठिकाण. गणपतीपुळे, पावस, मालवण, तारकर्ली आदी ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी व जेवण्यासाठी हॉटेल व लॉजिंगची सोय आहे. तशी सोय मिठबांव व कुणकेश्वर या ठिकाणी होणे कठीणच. कुणकेश्वरचे सौंदर्य व देवस्थान या तुलनेत या ठिकाणी हौशी पर्यटकांची संख्या अगदी नगण्यच. याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. कुणकेश्वर व तांबळडेग यातील ‘सन सेट पॉइंट’ हा अप्रतिम आहे. तसेच मिठबांव बीचवरून होणारे सूर्यास्ताचे दर्शन जिल्हय़ात एखाद्याच ठिकाणीच अपवादाने होते. उन्हाळी सुट्टय़ा तसेच गणेश चतुर्थीच्या सणाला मिठबांव बीच हे पर्यटकांनी सदैव गजबजलेले असते. पूर्वी मिठबांव व तांबळडेग या स्वतंत्र ग्रामपंचायती नव्हत्या. मात्र नंतर तांबळडेगला ग्रामपंचायत मिळाली व तांबळडेग गाव स्वतंत्र झाला. यामुळे मिठबांव गावातून वाहत जाऊन अन्नपूर्णा नदी ख-या अर्थाने तांबळडेगला मिळते. एका बाजूने वाहत येणारी अन्नपूर्णा नदी व दुस-या बाजूने धडका देणारा समुद्र यामुळे आता तांबळडेग हा चिंचोळा भाग शिल्लक राहिला आहे. वारंवार सागरी अतिक्रमणाचा अनुभव तेथील ग्रामस्थ घेत आहेत. तांबळडेग किनारी रमेश सनये यांनी देखणे साई मंदिर उभे केले आहे. मिठबांवमध्ये मंदिरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून देखणे मंदिर येथे उभे करण्यात आले. रामेश्वराचे प्राचीन मंदिर, विठोबाचे मंदिर भाविकांना आनंद देते. याच नदीच्या काठाशी हिंदळे गाव वसले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांचे हे गाव अतिशय संपन्न आहे. हिंदळय़ाचे काळभैरव देवस्थान जागृत श्रद्धास्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या देवळातही चित्रपट मलिकांचे चित्रीकरण होत असते. आंब्याच्या बागा हे या भागाचे वैशिष्टय़. मिठबांव खाडीवरूनच सागरी महामार्गाचा प्रवास असतो. देवगड तालुक्यातून ज्या चार नद्या वाहतात, यापैकी तीन नद्या या वैभववाडी, कणकवली परिसरातून येतात. तेथे असलेल्या धरण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होत असतो. मात्र, हे भाग्य अन्नपूर्णा नदीला नाही. या नदीला पाण्याची समस्या भेडसावत असते. उन्हाळय़ात पाणी कमी झाल्यावर दुतर्फा असलेल्या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आणि हळूहळू गोडय़ा पाण्याचे क्षेत्र कमी होऊन खा-या पाण्याचे प्राबल्य वाढते.
एका घराचे गाव ‘शेरीघेरा कामते’ अन्नपूर्णा नदीच्या काठाशी शेरीघेरा कामते हे गाव वसले आहे. या गावात एकच घर असून अन्य वस्ती नाही. गावात शेती-बागायती आहे. मात्र, कुणीही राहत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात हे गाव आश्चर्य मानले जाते. याशिवाय एकच घर असल्याने या गावाला ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जन्ममृत्यू नोंद रजिस्टर कार्यालये अशी कोणतेही कार्यालय नाही. एका अर्थाने अशा कोणत्याही गाव खुणा नसलेले गाव म्हणून शेरीघेरा कामते आपले वेगळेपण जपून आहे. तसेच देवगड तालुक्यातील सर्व देवस्थान इनाम गावे याच नदीच्या काठी वसली आहेत.