नितीन साळुंखे
आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. चर्चा सुरू झाली, ती विविध वाहिन्यांवर प्राईम टाईमच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोम, सर्वसाधारण भाषेत निरोधच्या, जाहीरातींच्या वेळेवरून. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहीरात दिवसा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दाखवण्यास बंदी आणली आहे. या जाहिरातींमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतात असं कारण देऊन या जाहिरातींवर वेळबंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय बरोबर आहे किंवा कसं, यावर जे मला वाटलं ते पुढे मांडणार आहे..! आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. चर्चा सुरू झाली, ती विविध वाहिन्यांवर प्राईम टाईमच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोम, सर्वसाधारण भाषेत निरोधच्या, जाहीरातींच्या वेळेवरून. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहीरात दिवसा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दाखवण्यास बंदी आणली आहे. या जाहिरातींमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतात असं कारण देऊन या जाहिरातींवर वेळबंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय बरोबर आहे किंवा कसं, यावर जे मला वाटलं ते पुढे मांडणार आहे..! लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो म्हणजे नक्की काय होतं, याचा उलगडा मला होत नाही. पुन्हा लहान मुलं म्हणजे किती वयाची, हे देखील लक्षात येत नाही. माझ्या वेळी मी लहान असण्याचं वय इयत्ता १० पर्यंत होतं. म्हणजे मी १६ वर्षांचा होईपर्यंत मला ‘तशी’ समज आली नव्हती, म्हणजे मी बच्चाच होतो. आता निश्चितच तशी परिस्थिती नाही, हे कोणीही मान्य करेल. हल्ली इयत्ता ३री- ४ थीच्या पोरापोरींनाही ‘त्यातलं’ व्यवस्थित समजत नसलं तरी त्याचा बऱ्यापैकी अंदाज असतो. मला मी १५-१६ वर्षांचा असताना ‘ती’ फक्त समज आली होती, हल्ली या वयाची मुलं बऱ्याच प्रकरणात बलात्काराचे आरोपी असतात. म्हणजे मुलांचं ‘कळतं’ होण्याचं वय आताशा बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. त्या प्रमाणे कायद्यातही बदल करण्यात येत आहेत. मुलं ही मुलं राहीलेली नाहीत..!! वय वर्ष ७च्या पुढची हल्लीची मुलं जीवशास्त्रीय दृष्ट्या लहान असतील, परंतू त्यांची ‘ती समज’ चांगल्यापैकी असते. आणि ही खरी-खोटी समज त्यांना देण्याचं महत्वाचं(?) कार्य विविध वाहिन्यांवर अनैतिक संबंधांना प्रतिष्ठा देणाऱ्या २४ तास चालू असलेल्या मालिका करत असतात, तेंव्हा या मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार, त्या मालिका भान हरपून पाहाणारे पालक का करत नाहीत? अशा मालिकांची तक्रार कोणी शासनाकडे केल्याचं अद्याप ऐकीवात नाही. निरोधच्या जाहिरातींप्रमाणे, या मालिकांवरही बंदी आणायला हवी मग..!कुणाही सज्जन माणसाला, चार सभ्य लोकांत ऐकायला कसंतरी होईल अशा ‘चोलीके पिछे..’ किंवा ‘नविन पोपट..’ किंवा ‘शीला की जवानी..’ छाप गाण्यांवर पाच-सहा वर्षांच्या सपाट छात्यांच्या एवढ्याश्या पोरी, नसलेल्या छात्या-कुले उडवत, त्या गाण्याच्या सिनेमातल्या हिरो-हिराॅईनप्रमाणेच हावभाव करत, तेवढ्याच वयाच्या पोरांसोबत डान्स करत असतात आणि त्यांचे समज असलेले (म्हणजे त्यांना समज आहे असं आपण गृहीत धरसेले) सुसंस्कारीत आई बाप कौतुकाने टाळ्या वाजवत असतात, तेंव्हा ती पोरं लहान आहेत, त्यांना असं नाचवल्याने त्यांच्या बाल मनावर काय बरे-वाईट परिणाम होतील, याचा विचार त्याच्या मनात येतो का, हा खरंच संशोधनाचा विषय आहे. मी कदाचित जुन्या विचारांचा असल्याने, माझ्या मनावर त्या तशा गाण्यांवर नाचत असलेली ती चिमुरडी मला बघवत नाही आणि मी माझ्यावरच टिव्ही बघायची बंदी घालतो..! हे मनोरंजनाच्या नांवाखाली जे काही चाललंय त्याचं झालं. पण विविध वाहीन्यांवर चोवीस तास माहिती देण्याच्या नांवाखाली सुरू असलेल्या बातम्यांमधे दिसणारी व ऐकूही येणारे राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी यांचे घोटाळे आणि त्याचं केलं जाणारं निर्लज्ज उदात्तीकरण, त्यांची एकमेकांवर केलेली खालच्या स्तरावरची उलट-सुलट वक्तव्य, आरोप-प्रत्यारोप, तुरूगातून सुटल्यावर त्यांचे होणारे जंगी स्वागत, बलात्काराच्या बातम्या, धार्मिक गुरूंचं बेताल वागणं-बोलणं-जेलात जाणं ह्या सर्वांचं काय? निरोधच्या जाहिरातींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो, मग यामुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर कोणते सुसंस्कार होतात, हे निरोधच्या जाहिरातीवर वेळबंदी आणणारे सांगू शकतील का? लहान मुलांच्या मनाचा विचार करता, यावर तर प्राधान्याने बंदी किंवा वेळबंदी यायला हवी. निरोधच्या जाहिरातीपेक्षाही कितीतरी आक्षेपार्ह जाहिराती, ज्यातून गरज नसताना स्त्री-पुरुषांची शारीरीक जवळीक दाखवतात, त्यांचं काय? सॅनिटरी नॅपकीन्सची जाहिरातही मग निष्पाप मुलांचं कुतूहल चाळवणारी नाही का? पिच्चर्सबद्दल तर बोलूयाच नको. आता थोडसं आपल्या जाहिरात विश्वाविषयी. खरंचर आपल्या देशात ज्या जाहिराती तयार केल्या जातात, त्या खरंच कल्पक असतात. मला तरी टिव्हीवर इतर काही पाहाण्यापेक्षा जाहिराती पाहायलाच खुप आवडतात (सन्माननीय अपवाद डिस्कव्हरी, नॅ.जिओ., हिस्टरी व तत्सम चॅनल्सचा). फेव्हीकाॅलची जाहिरात तर मला प्रचंड आवडते. कोणतेही शब्दोच्चार नसलेली ती जाहिरात, तीला जे सांगायचंय, ते अगदी ठार अडाण्यापर्यंतही व्यवस्थित पोहोचवते. असे कल्पक जाहिरात तयार करणारे, निरोध किंवा स्टे ऑन किंवा प्ले विनसारख्या पुरुषांनी वापरायच्या औषधांची एखादी सुचक जाहिरात नाही का तयार करू शकत? प्रत्येक वेळेला तोकडे कपडे आणि शारिरीक लगट दाखवल्यावरच त्या जाहिरातीतला मेसेज लोकांना समजेल असं त्यांना वाटतं का वाटतं, हे ही मला समजत नाही..! वास्तविक पाहात निरोध, पुरुषांनी वापरायच्या सेक्सवर्धक गोळ्या, सॅनिटरी नॅपकिन्स यांच्या जाहिराती दाखवायची मुळी आवश्यकताच नाही. ज्यांना याची गरज पडते, ते या वस्तू बरोबर शोधून काढतात. यात सॅनिटरी नॅपकिन्सचा अपवाद करता येऊ शकेल. संतती नियमनाबद्दल बऱ्यापैकी जागृती झालेली आहे. हल्ली बऱ्याच जणांना, अगदी ग्रामिण भागातही, एक किंवा दोन मुलं असतात. तिन-चार-पाच मुलं असलेली जोडपी हल्ली कमीच दिसतात. परंतू हा निरोधचा परिणाम नसून, याचं मुख्य कारण अधिक मुलं असणं हे आर्थिकदृष्ट्या परवड नाही, हे आहे. महागाईच निरोधचं काम करतेय, हा महागाईचा फायदा..! निरोध हल्ली संतती नियमन म्हणून कमी आणि एडसचा धोका कमी व्हावा यासाठी जास्त वापरले जातात आणि असा धोका कोणत्या प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या व्यक्तींना होऊ शकतो हे तुम्ही जाणताच आणि अशा व्यक्ती निरोध वा तत्सम साहित्य, अस्सल पियक्कड जसा देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यावर दारुचा गुत्ता जसा बरोबर शोधून काढतो, तशा बरोबर शोधत येतात. असं असतानाही निरोधची जाहिरात का दाखवतात? दारूच्या दुकानाच्या कुठे जाहिराती येतात, तरी खप आहेच ना? निरोधच्या जाहिरातीवर वेळबंदी घातल्याने निरोधच्या कंपन्या पिसाळल्या आहेत. त्यांच्या धंद्यावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याने, त्यांनी थयथयाट करणं सहाजिकच आहे. निरोधच्या कंपन्या का पिसाळल्या असाव्यात, याचा विचार करताना, मला वाटतं, निरोधची जाहिरात ही जाणत्यांसाठी नसावीच, जाणत्यांना ते कळतंच. परंतू मुलांचं वयात येण्याचं अलिकडचं घटलेलं वय पाहून, या नविन गिर्हाईकांना आकर्षित करण्यासाठी केल्या जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे नव्याने लहान वयातच तरूण होणारं त्यांचं गिऱ्हाईक कमी होईल, अशी त्यांची भिती असावी..! मला वाटत निरोधच्या जाहिरातींना वेळबंदी केली हे चांगलंच झालं. पण मग आपण आचरट आणि स्त्री-पुरुषांचे कसेही आणि कोणाबरोबरचेही संबंध सुचित करणाऱ्या मालिकांवरही बंदी घालायची मागणी करायला हवी. ‘बिग बाॅस’ आणि तत्सम रिआलिटी शोच्या नांवाखाली जो काही आचकटपणा दाखवतात, डान्स शो मधे कोवळ्या वयाची मुलं, बिभत्स अर्थांच्या गाण्यावर जो काही नाच करतात( मुलांच्या कौशल्याला दाद द्यायलाच हवी) त्यावरही बंदी आणायला हवी, बातम्यांमधेही काय दाखवावं आणि काय नाही याची सेन्साॅरशिप असायला हवी, अशी मागणी व्हायला हवी..आणि हल्ली दररोज झालेल्या अशाश्वत जगण्यामुळे आणि बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे लहान मुलांच्या हातातही स्मार्ट फोन देणं अपरिहार्य झाल्याच्या दिवसांत, त्या स्मार्टफोनवरून सर्व काही, अगदी पोर्नही, विनाबंदी बघता येतं, त्या स्मार्टफोनवर डोकं घालून बसलेली अगदी लहान मुलंही दिसू लागलीत, त्या अंतरी नाना कळा असलेल्या स्मार्टफोनवर बंदी घालावी अशी मागणीही यायला हवी. परंतू तसं होणार नाही, कारण या गोष्टी मोठ्यांनाही हव्या असतात. आपल्या समाजात असलेला दुटप्पीपणा दिसतो, तो असा. आपल्याला अडचणीच्या असणाऱ्या गोष्टींवर बंदीची मागणी करायची आणि आपणच मिटक्या मारत बघत असलेल्या वा करत असलेल्या, परंतू समाजस्वास्थ बिघडवण्याची ताकद असलेल्या गोष्टींवर सोयीनुसार गप्प राहायचं, ही आपली दुटप्पी मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली, इतकंच..!!