पुणे – बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी झाल्या आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने अनेक धोरण राबवली आहेत. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे, त्यामुळे येथील बचत गटांना लघुउद्योग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केले.
सांगवीतील पी. डब्ल्यू. डी मैदानावर पवनाथडी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. गिरीश बापट बोलत होते. यावेळी ॲक्सिस बँकेच्या (पश्चिम भारत) उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमृता फडणवीस, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हार्डीकर, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुनिता तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, महिला बचतगटांना काम करण्यासाठी आता व्यापक क्षेत्र उपलब्ध झाले आहे. खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तूंच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायाची चांगली संधी आहे. महिलांचा विकास करण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने अनेक धोरणे राबविली आहेत. या योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा.
अमृता फडणवीस म्हणाल्या, महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर स्व:ताला सिध्द केले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्व:ताच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. स्त्रियांनी शिक्षण घेवून आपल्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी आपला व आपल्या कुटुंबाचा विकास करावा.
यावेळी महापौर नितीन काळजे यांच्या सह विविध मान्यवरांची भाषणे झाली.