पुणे – हिमालयापासून ते केरळच्या समुद्रापर्यंत आपला देश हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्व देशातील कृषी भिन्नतेचा आविष्कार आपल्या देशात आहे. भारतातील ही शेती म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. पिकविणे ही एक निर्मिती आहे. त्यामुळे शेतकरी हा निर्मितीशील आहे त्यासोबतच तो आपला पोशिंदा देखील आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे. असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांच्या हस्ते बळवंतराव जगताप यांच्या मनातले कागदावर या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, आनंद कोठडिया, शेखर गायकवाड, प्रा.डॉ. पी.एन.रसाळ, अॅड. अशोक पवार, विकास देशमुख यावेळी उपस्थित होते.
राम ताकवले म्हणाले, शेती करणारा माणूस कोण आहे हे पाहिले जात नाही. तिथे प्रत्येकजण समान असतो. ही समानता शहरातील माणसामध्ये दिसत नाही. कृतीशी शिक्षणाचा संबंध लावायला हवा. जे शिक्षण कृतीशील असते, तेच शाश्वत असते. जे शिक्षण तुम्हाला समाज ज्ञान देते, तेच तुमच्या जीवनात उपयोगी असते.
बळवंतराव जगताप म्हणाले, आधुनिक माध्यमांच्या काळात जग जवळ येत आहे. इंटरनेट, टिव्ही चा वापर वाढत आहे. या साºयातून आपले जीवन कसे व्यतीत करायचे हे या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयुष्यात भेटणारी माणसे, त्यांचे आलेले अनुभव आणि त्यातून निर्माण झालेली भविष्यमुल्ये ही पुस्तकाचा गाभा आहेत. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंतराव मोहिते यांनी आभार मानले.