पुणे – किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कृती कार्यक्रमात आज खडकवासला जवळील सांगरूण या गावात सरपंच परिषद पार पडली. या परिषदेत सांगरूण गावातल्या महिलांनी कापडी पिशव्यांचं उत्पादन करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती सांगरूणच्या सरपंच सीता मानकर यांनी दिली. यासाठी आवश्यक तो कच्चा माल कुडजे गावचे सरपंच समीर पायगुडे उपलब्ध करून देणार आहेत. असेही त्यांनी सांगितले. या सरपंच परिषदेत ग्रामसेवक अभय निकम, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मानकर, सुषमा भोकरे, मीरा गायकवाड, तानाजी भोकरे आदी उपस्थित होते.
खडकवासला धरणाचे पाणी प्लॅस्टिकमुळे प्रदूषित होऊ नये यासाठी सांगरूण गावाने प्लॅस्टिक मुक्तीचा निर्धार केला. त्यासाठी या गावाला राज्य शासनाकडून गौरवण्यात आले होते. प्लॅस्टिकचा वापर गावात होत नसल्याने पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता हे कापडी पिशव्यांचे उत्पादन गावातच सुरू करणार आहे. या पिशव्या महिलांच्या सहभागातून तयार करण्यात येणार असून त्याद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे मानकर यांनी सांगितले.