पुणे : शेतकरी जगला पाहिजे, शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या रोखल्या पाहिजेत, असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. परंतु याकरीता योग्य दरात शेतक-यांचा माल खरेदी करुन त्यांना आपण मदत करायला हवी. तांदूळ महोत्सवासारख्या माध्यमातून ही संधी पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आली असून असे महोत्सव म्हणजे शेतक-यांची एकप्रकारे सेवा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठेतर्फे खजिना विहिर चौकातील केंद्रामध्ये आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद््घाटन टिळक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्राहक पेठेचे अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अँड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख किरण गुंजाळ, महोत्सवातील पहिले ग्राहक राखी बावडेकर, एस.एम.व-हाडपांडे आदी यावेळी उपस्थित होते. तांदूळ महोत्सवाचे यंदा 26 वे वर्ष आहे.
मुक्ता टिळक म्हणाल्या, रास्त दरात उत्तम सेवा किंवा वस्तू मिळणे, आजच्या काळात दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे. ग्राहक पेठेच्या माध्यमातून मिळणा-या सेवा या उत्तम दर्जाच्या आणि विश्वसनीय आहेत.
सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. उत्पादक ते ग्राहक थेट व उत्तम दर्जाचे तांदूळ घाऊक दरात देण्याचा यामाध्यमातून प्रयत्न केला जात आहे. इतरत्र भाव वाढले, तरीही महोत्सवात भाववाढ केली जात नाही, हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून चिन्नौर पर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात आहेत. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे.
राजेश शहा म्हणाले, सन १९९१ मध्ये तांदूळ महोत्सवाची संकल्पना समोर आली. पदपथावर सुरु केलेला हा महोत्सव आज मोठया प्रमाणात राबविला जात आहे. उत्तमप्रतीचा तांदूळ थेट दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरातसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे.