पुणे – निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ची निर्मिती आणि दीपक पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बारायण’ ची प्रस्तुति शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो हेड म्हणून काम केलेले आहे.
अलीकडे मुलांच्या शिक्षणाबाबत पालक अधिक सजग झाले आहेत. गुणांच्या टक्केवारीच्या स्पर्धेत आपला पाल्य कुठेही मागे राहता कामा नये अशी त्यांची भूमिका असते, मग विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये गेले की त्यांना तुझं आता 12 वी वर्ष जवळ आलं आहे याची सतत जाणीव करून दिली जाते, मग विद्यार्थी 12 वी मध्ये गेले की घराघरात ‘बारायण’ सूरू होते. यावर अतिशय खुमासदार शैलीत दिग्दर्शक दीपक पाटील यांनी भाष्य केले आहे.
‘बारायण’ या चित्रपटात अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे.
तर बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर,आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीरचौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटकेपध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा –
संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ीपगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनीचित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.