– मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन ; वंचित-विशेष मुलींचा सहभाग
पुणे – हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन तरुणाईसोबत दिग्गजांनी वंचित मुलांसोबत बोरन्हाण साजरे केले. सामाजिक जाणीवेचे भान राखत समाजातील वंचित विशेष मुलांनादेखील सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता मकरसंक्रातीनिमित्त या आगळ्यावेगळ्या वंचितांच्या बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते.
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे सुभाषनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न.म.जोशी, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, एअरमार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि.द.फडणीस, विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, भाऊसाहेब भोसले, पोपट सिंघवी, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, बालसदनच्या अश्विनी नायर, अथश्री फाऊंडेशनच्या वनिता नायर, परिक्षीत कुलकर्णी, संध्या स्वामी, निष्कर्ष जैन, विवेक शिवेरकर आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ८ वे वर्ष होते. देहविक्रीय करणा-या महिलांच्या मुलांसाठी काम करणा-या सहेली संस्थेतील मुले आणि कोथरुड बालसदन संस्थेतील अनाथ मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
न.म.जोशी म्हणाले, पापाकडून पुण्याकडे आणि असत्याकडून सत्याकडे आपण जायला हवे. परंतु देशात चत्मकारी परिस्थिती निर्माण होत आहे. तरुण ही परिस्थिती बदलू शकतात. त्यामुळे तरुणांनी चांगल्या कार्यासाठी आपली शक्ती उपयोगात आणायला हवी. जोपर्यंत तरुणाई या देशात आहे, तोपर्यंत समाजात चांगल्या कार्याच्या प्रकाशवाटा उजळत राहणार आहेत.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, संस्काराचा संग जडावा आणि त्यातून मानवी जीवनात क्रांती घडावी, असे कार्य तरुणांकडून होत आहे. मानवतेमध्ये स्थिर राहणे ही प्रकृती, मानवतेकडून दिव्यत्वाकडे जाणे ही संस्कृती आणि मानवतेकडून दानवतेकडे जाणे म्हणजे विकृती. त्यामुळे आपण प्रत्येकाने किमान स्थिर राहण्याकरीता प्रयत्न करीत प्रकृतीला उत्तमरितीने नटवायला हवे, असेही त्यांनी सांगितले.