बाळा कदम
संध्याकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे विश्वनाथ पराडकर, नाना पाटील, शानू बांगर, नानू मालवणकर वगरे मंडळी बांबरवाडीच्या फेमस ‘पिंकी हेअर ड्रेसर्स’ या सलूनमध्ये गजाली मारत बसले होते. तुकारामाची पंधरावडाभर वाढलेली खरखरीत दाढी जुने ब्लेड नव्या पाकिटातून काढून भिक्या खरडवित बसला होता.
कुठल्या तरी खूनप्रकरणावर इतरांची गरमागरम चर्चा रंगात आली होती आणि अशातच बाळया वाडेकर सलूनमध्ये आला. आल्या-आल्याच त्याने शरद्याला विचारलं,’शरद्या, कल्याण काय इला?’
‘हळू बोल. जिल्हयात नये एसपी इले हत. त्येंका कळला तर आकडयावाल्याक आकडी येतली.’ विश्वनाथाने बाळयाला सल्ला दिला. पण शरद्याला त्याचं काहीच नव्हतं.
‘तीनशे पस्तीस, दोनशे चाळीस.’ रोजच्या सवयीप्रमाणे शरद्याने पत्तीसह आकडा सांगितला. इकडे सोळा आकडा आल्याचे कळल्यावर बाळयाने कपाळावर हात मारून घेतला.
‘काय रे बाळया, काय झाला?’ विश्वनाथाने सहज चौकशी केली. यावर बाळया म्हणाला, ‘अरे काय सांगा तुका, फाटपटी माका सपान पडला. त्या सपनात हय़ां शरद्यान येव्न माका सांगितल्यान की, एकसष्ट आकडो लाव. मी कदी चुकान पन आकडो लावनय नाय. पन सहज एकसष्टवर धा रुपये टेकवलंय नी इलो सोळा. म्हंतत ना, देव देता नी कर्म न्हेता. एकसष्टची पलटी मारलं आसतंय तर आता शेट झालं आसतंय.’ नाना पाटलाने पावती बघितली. एकसष्टवर खरोखरच दहा रुपये होते. अचानक नानाच्या काय मनात आलं कुणास ठाऊक! बाळयाची थोडी चेष्टा करायची त्याने ठरवली आणि तो त्याला म्हणाला,’अरे मग कपाळार कित्या हात मारून घेतंस? अध्रे तरी तुका पैशे मिळतलेच ना!’
‘म्हंजे! माका नाय कळला!’
‘तुका कसा कळतला? पयल्यांदाच तू आकडो खेळतंस ना! अरे बाबा, तू एकादो आकडो खेळलंस आनी त्येची पलटी पडली तर तुका अध्रे पैशे मिळतंत. आता तू एकसष्टवर धा रुपये लावलंस. पन इलो सोळा. त्येच्यामुळा तुका पाच रुपयाचे साडेचारशे रुपये मिळतले.’ ‘काय सांगतंस काय? साडेचारशे रुपये?’ आकडयाचा अर्धा व्यवहार ऐकून बाळया जाम खूश झाला.
‘मग मी काय खोटा सांगतंय? व्हया तर हय़ां शरद्याकच इचार.’ नानाचं बोलणं ऐकून शरद्याही सर्व समजून गेला. त्यानेही नंदीबैलासारखी मान हलवली.
‘हां, पन तुका तसो अर्ज करूक व्हयो.’ नानाने पुढची माहिती दिल्यावर बाळया म्हणाला,’तो कसो करायचो?’
‘त्येच्यात येवढा इशेश काय नाया. को-या कागदावर बिटर मालकाक लिवायचा की, मी एकसष्टवर धा रुपये खेळलंय. पन सोळा आकडो इल्यामुळा माका अध्रे पैशे देवची कृपा करावी. खाली तुजी सही मार. बाजूक एका साक्षीदाराची सही मारायची आनी अर्जाक खेळलेली पावती जोडूची.’एवढाच ना? आता कोरो कागद हाडतंय.’ असं म्हणून बाळया बाजूच्या गादीवर गेला. इकडे सगळय़ांनी दाबून ठेवलेलं हसणं एकदम मोकळं केलं. हसता-हसता तुकारामाच्या गालाला भिक्याचा वस्तरा लागला आणि भिक्याच्या गालावर तुकारामाचा हात पडला. बाळयाने कागद आणल्यावर विश्वनाथाने अर्ज लिहून दिला. खाली बाळयाने व साक्षीदार नाना पाटलाने सही मारली. सगळं झाल्यावर विश्वनाथाने आणखी बॉम्ब टाकला. तो म्हणाला, ‘बाळया, नशीब म्हणान आमका पावती दाखवलंस. नायतर तुका दुस-या-तिस-यान फसवल्यान आसता. बरा ता जावंदे! आता आमी मानूसकीन तुज्यासाठी येवढा केलंव. आमका निदान भजी नी च्याय तरी सांग.’ ‘पन पयल्यांदा पैशे तरी हाडतंय.’ ‘पैशे हाडीपर्यंत थांबाक येळ कोनाक हा? आमचो अड्डयार जाव्चो येळ झालो. आता तुज्या खिशात पैशे किती आसत?’ शानू बांगराने विचारलं. शानूच्या प्रश्नावर बाळयाने स्वत:च्या खिशाचा अंदाज घेतला आणि म्हणाला, ‘शंभर-येक आसतले.’ ‘अरे, मग त्येच्यातच भागवया. चल, हटेलात आरडर दे.’ तिथून सगळे उठले आणि पाटलाच्या हॉटेलात गेले. भिक्यानेही शेवटी-शेवटी तुकारामाची दाढी ओढून काढली आणि तोही त्यांच्याबरोबर भजी-च्यायसाठी निघाला. तुकारामासह नऊ भजी व सात चहा झाले. शंभर रुपयातले उरलेले दोन रुपये, शानू आणि नानूने गोवा घेतला. काळोख पडला तसं मग सगळे जण आपापल्या मार्गाने गेले. इकडे शरद्याने बिटर मालकाला व व्यवस्थापकाला फोन लावून सगळी हकिगत सांगितली. ते पण हसून-हसून हैराण झाले.
दुस-या दिवशी सलुनात आल्यावर विश्वनाथ, नाना पाटील, शानू बांगर, नानू वगैरेंना शरद्याकडून कळलं की, बाळया वाडेकराकडून बिटर मालकाने आणखी चार अर्ज लिहून घेतले आणि बारा जणांच्या सहया घेतल्या. शेवटी सगळा प्रकार उघड झाल्यावर बाळया नाना पाटलाला शिव्या देत रात्री नऊ वाजता घरी गेला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा आलेला आकडा ऐकल्यावर नेहमी खेळणारा नंदू ‘पलटी नाय’ म्हणून सांगतो तेव्हा बाळया वाडेकराची आठवण येते आणि मटक्याचे अध्रे पैसे आठवून हसून-हसून जीव जातो.