चला करूया सेंद्रिय शेती

January 16th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

शिवाजी खरात

 

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी! त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणार्या घटकांची आपण पुढीलप्रमाणे माहिती घेऊया.
१. पाचटापासून गांडूळ खत.
२. निंबोळी अर्क
३. नाडेफ कंपोस्ट
४. बीजामृत
५. हिरवळीची खते
६. दशपर्णी अर्क
७. बायो-डायनॅमिक कंपोस्ट
पाचटापासून गांडूळ खत
पिकाचे उत्पादन कमी होण्याची जी महत्त्वाची कारणे आहेत त्यापैकी सेंद्रिय पदार्थांचा अभाव असल्याने शेतकरी रासायनिक खतांचा सर्रास व अतिरेकी वापर करू लागले आहेत. त्यास जोड म्हणून पाण्याचाही अतिरेकी वापर होऊ लागला आहे. त्यामुळे काही भागांतील जमिनी सध्या अक्षरशः ओसाड बनल्या आहेत. त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात श्रम, पैसा खर्ची पडणार आहे
गांडूळ खतनिर्मिती :
जागेची निवड व शेड उभारणी : गांडूळ खतनिर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता शेतावर उपलब्ध असणार्या वस्तू बांबू, लाकडे, उसाचे पाचट यांचा वापर करावा. त्याची मधील उंची ६.५ फूट; बाजूची उंची ५ फूट व रुंदी १० फूट असावी. छपराची लांब आपल्याकडे उपलब्ध असणार्या उसाच्या पाचटानुसार कमी-जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून १-१ फूट दोन्ही जागा सोडून ४ फूट रुंदीचे व १ फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने प्लॅस्टर करावे. तसेच खालील बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी (व्हर्मीवॉश) तळाशी पाइप टाकावा. वाफे तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी ८-९ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत. खड्यातील माती चांगली चोपून टणक करावी.
पाचट कुजविणे :
छपरामध्ये खोदलेल्या चरांमध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे व त्याची उंची जमिनीपासून/वीट बांधकामापासून २०-३० सेंमी ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरीया ८ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १० किलो व ताजे शेणखत १०० किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाला ५-१० सेंमी थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरीया, सुपर फॉस्फेट द्रावणास पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धक एक टनास एक किलो या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडेसे वापरावे. अशा पद्धतीने खडा/वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे व पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने झाडून टाकावे. दररोज त्यावरती पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल. शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी २,००० हसिनिया फोटेडा जातीची गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे २.५ ते ३ महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झाल्याचे दिसेल.
गांडूळ खत तयार झाल्याची चाचणी :
१) सर्व पाचटापासून अंडाकृती लहान विफेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते.
२) गांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो.
३) गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो.
४) खताचा रंग गर्द काळा असतो.
५) कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर १५-२०ः१ असे असते.
चांगले गांडूळ खत :
१) कार्बन नायट्रोजन गुणोत्तर १६ः१
२) नत्र प्रमाण २.४९ ते ३.५९%
३) स्फुरद प्रमाण ०.८९ ते २.२८%
४) पालाश प्रमाण ०.४४ ते ८.२१%
५) सेंद्रिय कार्बन २३%
याशिवाय नत्र, स्फुरद स्थिर करणारे जिवाणू तसेच बुरशी असते.
गांडूळ खताचे फायदे :
१) जमीन : जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते. जमिनीत हवा खेळती राहते. जमिनीचा सामू सातच्या आसपास योग्य पातळीवर राखला जाते. जमिनीची धूप व बाष्पीभवन कमी होते.
२) झाडे व किडे : पिकांना सर्व प्रकारचे अन्नघटक सहज व योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. पिकांची जोमदार वाढ होऊन कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. मिळालेल्या उत्पन्नाचा दर्जा उत्तम प्रतीचा असतो. फुले, फळे, भाजीपाला यांची टिकाऊ क्षमता वाढते. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांत माल पाठविणे शक्य होते.
३) शेतकरी : जमिनीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते. पाण्याची बचत होते. त्यावर येणारा खर्चही वाचतो. उत्पादित मालाचा दर्जा चांगला असल्याने बाजारभाव चांगला मिळतो.
४) पर्यावरण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते.
५) देश : रासायनिक खते आयातीसाठी येणारा खर्च कमी होतो. प्रदूषणविरहित मालास परदेशात मागणी असल्याने परकीय चलनही मिळते.

निंबोळी अर्क
५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत – उन्हाळ्यात (पावसाच्या सुरुवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. पाच किलो चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसर्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे. वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा. निंबोळी अर्क अधिक प्रभावी करण्यासाठी दहा लिटर अर्कामध्ये खालील पदार्थ फवारणीपूर्वी २४ तास अगोदर टाकून भिजवणे : ३-३ तासांच्या अंतराने ढवळत राहणे व वापरण्यापूर्वी फडक्याने गाळून वापरावे. १) अर्ध्या किलो हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा २) २०० ग्रॅम तंबाखू पूड (पाण्यात उकळून थंड करून अर्क काढावा) ३) २५० ग्रॅम गूळ किंवा निरमा पावडर, १२ ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा. कडक उन्हात फवारणी टाळा.
दशपर्णी अर्क कसा करावा
१) कडुनिबांचा पाला ५ किलो २) घाणेरी (टणटणी) पाला २ किलो ३) निरगुडी पाला २ किलो ४) पपई पाला २ किलो ५) गुळवेल/पांढरा धोतरा पाला २ किलो ६) रुई पाला २ किलो ७) लाल कण्हेर पाला – २ किलो ८) वण एरंड पाला २ किलो ९) करंज पाला २ किलो १०) सीताफळ पाला २ किलो + २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा + पाव किलो लसूण ठेचा + ३ किलो गावरान गाईचे शेण + ५ लिटर गोमूत्र व २०० लिटर पाण्यात मुरवा, सावलीत ठेवा आणि गोणपाटाने झाका. दिवसातून ३ वेळा काठीने ढवळा व पुन्हा झाकण ठेवा अशा प्रकारे तीस दिवस आंबवावे. अर्क गाळून घ्या व उपलब्धतेनुसार प्लास्टिक डब्यामध्ये साठवून ठेवा. हा अर्क सहा महिन्यांपर्यंत वापरता येतो. वापरण्याची मात्रा ५ लिटर अर्क ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणीसाठी वापरावा.
हिरवळीची खते:
दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खताची उपलब्धता व पर्यायाने जमीनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हिरवळीची पिके घेऊन फुलोर्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळून जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढते. जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास सेंद्रिय कर्बाची अत्यंत आवश्यकता असते; परंतु भारत हा उष्ण प्रदेश असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिटेशन खूप झपाट्याने होते व सेंद्रिय कर्बाची नेहमीच कमतरता भासते. सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीत वाढल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूंची संख्या खूप वाढते. तसेच सेंद्रिय पदार्थ मातीच्या लहान लहान कणांना एकत्र सांधून ठेवतो. हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सेंद्रिय पदार्थ जेव्हा सनिल अवस्थेत (अॅटोबीळ) कुजतो तेव्हा त्यांच्यातील मूलद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. शिवाय कुजताना काही रासायनिक बदल होऊन अनुपलब्ध असलेली मूलद्रव्ये उपलब्ध होतात.
हिरवळीच्या खतासाठी प्रमुख पिके
मुळावर गाठी असणारी दालवर्गीय (बोरू, बैंचा, मूग, उडीद, मटकी, गवार, चवळी इ.) आणि गाठी नसलेली (ज्वारी, मका, सूर्यफूल) अशा दोन्ही प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरतात. या दोन पिकांमधील प्रमुख फरक म्हणजे मुळावर गाठी असलेल्या पिकाद्वारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीत घातले जातात, तर गाठी नसलेल्यांमधून फक्त सेंद्रिय पदार्थच जमिनीत घातला जातो. हिरवळीचे पीक ५०% फुलोर्यावर असताना (४० ते ५० दिवसांनंतर) जमिनीत गाडावे. हिरवळीचे खताचे पिका गाडणे व दुसरे पीक पेटणे यामधील कालावधी फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतरच दुसर्या पिकाचे पेरणी करणे योग्य ठरते. (साधारणपणे ८ आठवड्यांनंतर)
नाडेफ कंपोस्ट
टाकी बांधण्याची पद्धत : पाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध्ये ९ इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसर्या थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे. नाडेफ भरण्यासाठी लागणारी सामग्री : १) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ. २) ८ ते १० पाट्या शेणखत व १ गाडी माती. ३) ४ ते ५ बॅटल पाणी. ४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.
नाडेफ भराई पहिला थर : तळाला १५ ते ८० सेंमी जाडीचा काडी कचरा, पालापाचोळा, धसकटे इत्यादी घेऊन त्यावर शेणकाला शिंपडावा. त्यावर साधारण ५ ते ६ घमेली माती पसरून टाकावी. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन नाडेफ बांधकामाच्या वर १.५ फुटापर्यंत भरून घ्यावा. त्यावर माती व शेणाच्या मिश्रणाचा लेप देऊन लिपून घ्यावे. काही दिवसांनंतर नाडेफमधील सामग्रीखाली दबलेली आढळते. अशा प्रसंगी पुन्हा वरीलप्रमाणे एकावर एक थर देऊन माती व शेणाच्या मिश्रणाचा थर देऊन घ्यावे.
बायो-डायनॅमिक कंपोस्ट
बायो-डायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य लागते. १) एस – ९ कल्चर २) शेतातील काडीकचरा ३) कापसाच्या काड्या ४) शेतीतील तण ५) कडूनिंबाच्या झाडाची पाने ६) निरगुडीची पाने ७) मोगली एरंडाची पाने ८) गाजर गवत ९) गिरीपुष्प १०) बेशटम ११) ताजे शेण ८ ते १० दिवसांचे १२) १५०० ते २००० लिटर पाणी एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, ०५ रुंद जागा लागते व या जागेत ३ ते ४ फूट उंच ढीग लावून खत तयार करतात. ढिगांची दिशा पूर्व-पश्चिम असावयास हवी. ढिग लावताना १५ बाय ५ फूट जागा स्वच्छ करून त्यावर हलका पाण्याचा सडा टाकावा. वरीलप्रमाणे जमा केलेल्या ओल्या व सुक्या काडीकचर्यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. त्यानंतर पहिला १ फुटाचा काडीकचर्याचा थर द्यावा. त्यावर पाणी टाकावे. दुसर्या ८ ते ३ इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा १ किलो एस-९ कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ चांगले ढवळावे व हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात सोडावे. त्यानंतर १ फुटापर्यंत जैविक पदार्थ व ओले शेण यांचा थर लावावा. प्रत्येक थरावर एस-९ कल्चरचे द्रावण शिंपडावे. अशा प्रकारे ३ ते ४ फूट उंच डेपो तयार करावा. शेणमातीने लिंपून घ्यावा. एक महिन्यानंतर डेपोला पलटी द्यावी अशाप्रकारे आठ महिन्यात उत्तम कंपोस्ट तयार होते.
बीजामृत:
बीजामृताच्या बीजप्रक्रियेमुळे उगवणशक्ती वाढते तसेच तुटवातीची वाढ जोमदार होते. साहित्य :– २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध, जिवाणू माती मूठभर व ५० ग्रॅम चुना.
अमृत पाणी:
साहित्य :- पावशेर देशी गाईचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, २०० लिटर पाणी. १० किलो शेणामध्ये पावशेर तूप व अर्धा किलो मध मिसळून हे मिश्रण २०० लिटर पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्यावे. जमिन वाफशावर असताना जमिनीवर शिंपडावे किंवा पाटाच्या पाण्यातून योग्य प्रमाणात सोडावे.
जीवामृत:
साहित्य :- १० किलो देशी गाईचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो जुना काळा गूळ, २ किलो कडधान्याचे पीठ, ज्या शेतामध्ये वापरावयाचे आहे त्या शेतामधील १ किलो माती, २०० लिटर पाणी. वरील सर्व साहित्य २०० लिटर प्लास्टिक पिंपामध्ये भिजत ठेवावे. चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण २ ते ७ दिवस आंबवावे. दरम्यानच्या काळात सकाळी, दुपारी व संध्याकाळी द्रावण ढवळावे. जमीन वाफशावर असताना जमिनीवर शिंपडावे किंवा पाटाच्या पाण्यातून योग्य प्रमाणात (वरील द्रावण एक एकरासाठी) सोडावे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions