पुणे – ढिल दे रे… काट रे, तो पतंग काट… असा काही वर्षांपूर्वी इमारतींच्या गच्चीवरुन, बागेतून आणि मोकळ्या मैदानांतून कानावर पडणारा आवाज आता सहज ऐकू येणे दुरापास्त झाले आहे. मात्र, मकरसंक्रांत, त्याचे महत्त्व आणि पतंग आकाशात उडवून साजरा केलेला आनंदोत्सव सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर यंदाच्या मकरसंक्रांतीनिमित्त पुणेकरांना अनुभवायला मिळाला. एकामागून एक आकाशात भरारी घेणा-या पतंगांची चढाओढ आणि इतरांचे पतंग कापून आपला पतंग आकाशात उंचच उंच पोहोचविण्यासाठी लागलेले पतंग युद्ध यानिमित्ताने पतंग महोत्सवात पहायला मिळाले.
श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्यावतीने संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रथमच पतंग महोत्सव व पतंग उडविणे स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी इयत्ता २ री ते १० वी च्या मैदानावर येणा-या मुलांसह विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही महोत्सवात मोठया संख्येने सहभाग घेतला. लहानांप्रमाणेच मैदानावर येणा-या मुला-मुलींच्या पालकांनी महोत्सवात सहभागी होत पतंग उडविताना आपले बालपण पुन्हा एकदा अनुभविले. यावेळी कुलमुख्य आदित्य धायगुडे, कुलसप्ताह समितीप्रमुख शिवाजी रोडे यांसह मैदानावरील अधिकारी व पालक उपस्थित होते.
कुलमुख्य आदित्य धायगुडे म्हणाले, मोबाईल, कॉम्प्युटरच्या जमान्यात हरवत चाललेल्या पारंपरिक खेळांना पुनरुज्जीवीत करीत पतंग उडविण्यासारखे खेळ आजच्या पिढीला माहित व्हावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्यमुलांनी मुलांची मुलांसाठी चालविलेली चळवळह्ण असे ब्रीद अंगिकारून गेली १०० वर्षे कार्यरत असलेले पुण्यातील हे एकमेव पथक आहे. यंदा संस्थेच्या शताब्दीनिमित्त आयोजित कुलसप्ताह क्रीडा सप्ताहामध्ये एका नाविन्यपूर्ण स्पर्धा म्हणून हा पतंग महोत्सव घेण्यात आला.