एपिफनी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन
पुणे – मुलगी वाचवा…मुलगा-मुलगी एक समान…असा सामाजिक संदेश देणारी चित्रे, भारतीय सण…झाडे लावा झाडे जगवा…पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा अशी प्रबोधनात्मक चित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. शालेय विद्यार्थीनींनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी लाडक्या गणरायाचे चित्र रेखाटले.
एपिफनी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे एपिफनी इंग्लिश मिडीयम स्कुलमधील ७ विद्यार्थिनींनी काढलेल्या चित्रांचे आर्ट अॅण्ड क्राफ्ट प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लाहोटी यांच्या हस्ते झाले. यावेळी साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कदम, पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्सचे रिजनल हेड किरण जावळकर, शिक्षिका भारती पाटसकर, मेघा साळवी, संकेत निंबाळकर, मधुकर कदम, मयुरेश वनारसे उपस्थित होते.
मुरली लाहोटी म्हणाले, चित्रकला ही एक भाषा आहे. चित्रकार नेहमी रंग, रेषेच्या भाषेत बोलतो. आदिमानव देखील आपल्या भावना चित्रांद्वारे व्यक्त करीत होते. प्रत्येकाला काही अंशी चित्रकला अवगत असली पाहिजे. चित्रकलेच्या माध्यमातून एखादी भाषा येत नसेल तरी आपण आपले विचार मांडू शकतो. भविष्यकाळात चित्रकला विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
कैफा शेख, इकरा खान, नारायणी पानघंटी, महिमा गुजर, साक्षी सिंह, अलिश्बा तांबोळी, असिया तांबोळी या सात विद्यार्थिनींनी प्रदर्शनात मांडण्यात आलेली चित्रे काढली आहेत. प्रदर्शन १४ जानेवारी पर्यंत पुणेकरांसाठी खुले असणार आहे.