निमित शिशोदिया; ट्रिनिटी अकॅडमी व इकोड नेटवर्क यांच्यात सामंजस्य करार
पुणे – “विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी संशोधन केंद्र उपयुक्त ठरतात. अशा प्रकारच्या संशोधन केंद्रात अथवा प्रयोगशाळेत प्राध्यापक आणि विद्यार्थी विविध प्रकल्पांवर एकत्रित काम करून नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतात,” असे मत लंडन येथील इकोड नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमित शिशोदिया यांनी व्यक्त केले.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग व लंडन येथील इकोड नेट्वर्कस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत ट्रिनिटीच्या संगणक अभियांत्रिकी विभागात ‘सॉप्टवेअर डिफाइन नेटवर्क्स (एसडीएन) प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यावेळी झालेल्या कार्यशाळेत शिशोदिया बोलत होते. प्रसंगी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, संगणक विभागप्रमुख प्रा. संतोष दराडे, इकोडच्या अंकिता मांडेकर, योगिता हांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
निमित शिशोदिया म्हणाले, “एसडीएन प्रणाली अलीकडे झपाट्याने विकसित होत आहे. परंतु बाजारात याबाबत पुरेशी माहिती आणि कौशल्ये नसल्याने आपल्याकडे जास्त पर्याय उपलब्ध नसतात. एसडीएनच्या या केंद्रातून ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न इकोड आणि ट्रिनिटी करेल. ओपन नेटवर्किंग फाऊंडेशन (ओएनएफ) यांच्या कडून मान्यता प्राप्त करून इकोड नेटवर्क्स एसडीएन प्रक्षिक्षण आणि प्रमाणपत्र पुरवत आहे. ट्रिनिटीमध्ये उभारलेल्या या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बनविण्यासाठी संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.”
हर्षदा जाधव म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण आणि संशोधनात्मक शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमी नव्या कल्पनांना वाव देते. एसडीएन तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक नेटवर्कमध्ये बदल करून इकोडमार्फत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन देणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक जोरावर अन्य संस्थाकरिता हे केंद्र आदर्श निर्माण करेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले शिक्षण देण्यासाठी सतत नवनवीन कल्पनाना प्रोत्साहन दिले जात आहे.”
डॉ. विजय वाढई म्हणाले, “इकोडसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुत्क आहोत. विद्यार्थ्यांना पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाची माहिती करून देणे. उच्च गुणवत्तेचा शोध घेऊन नव उपक्रमाची निर्मिती करण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांना बदलणाऱ्या जागतिक बाजारपेठांसाठी नवनवीन सेवांचा विकास करण्यासाठी आवश्यक संशोधन आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”