खासदार अनिल शिरोळे यांचे मत ; स्वस्थ सारथी मध्ये ३ हजार सीएनजी रिक्षाचालकांना आरोग्य कवच
महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे मोफत शिबीराचे आयोजन
पुणे – दिल्लीप्रमाणे पुणे शहरात देखील मोठया प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. सीएनजीच्या माध्यमातून एमएनजीएल सारख्या सरकारी कंपन्या प्रदूषण कमी करण्याकरीता हातभार लावत आहेत. परंतु सध्याच्या प्रदूषित वातावरणात रिक्षाचालकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्याकरीता रिक्षाचालकांनी संतुलित आहार व योगा करणे गरजेचे आहे. स्वस्थ सारथी सारख्या शिबीरातून रिक्षाचालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यातील ३ हजार सीएनजी रिक्षाचालकांसाठी आयोजित स्वस्थ सारथी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद््घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर येथील रमा -रमण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कामगार नेते आणि रिक्षा पंचायतीचे संचालक डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनचे सचिव सुनील पांडे, डॉ. सचिन देशपांडे, डिंपल बुचे आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३ रे वर्ष आहे. डॉक्टर्स फाऊंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अॅन्ड मेडिसीन यांचे शिबिरासाठी सहाय्य मिळाले आहे.
नितीन पवार म्हणाले, रिक्षाचालकांना सीएनजी किटकरीता पुणे महानगरपालिकेकडून प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळते. अनेक रिक्षाचालक अजूनही या अनुदानाच्या प्रतिक्षेत असून सुमारे ४ हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. प्रदूषण विरहित पुण्याकरीता सीएनजी आवश्यक असून यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात ७ कोटी रुपयांची तरतूद झाल्यास हे अनुदान लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहचू शकेल. याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी अनिल शिरोळे यांच्याकडे केले.
सुनील पांडे म्हणाले, शनिवार, दिनांक २७ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत हे विनामूल्य शिबिर होणार आहे. यामध्ये तब्बल ३ हजार सीएनजी रिक्षाचालक, सीएनजी बसचालक यांची तपासणी होणार आहे. शिबीरात नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, दंतचिकित्सा तसेच आवश्यकतेनुसार योग व प्राणायाम प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
* तब्बल ३ हजार रिक्षाचालकांच्या आरोग्याचे होणार विस्तृत सर्वेक्षण : संतोष सोनटक्के
रिक्षाचालकांसाठीच्या तपासणी शिबिरात चालकांचे आरोग्यविषयक विस्तृत सर्वेक्षण देखील होणार आहे. यामध्ये रिक्षाचालकांना होणाºया व्याधी आणि त्यानुसार आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येईल. तसेच सीएनजीच्या वापराचे फायदे आणि पर्यावरणाकरीता त्याची आवश्यकता देखील शिबिराच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. तपासणीकरीता रिक्षाचालकांनी ९६२३०३७३१५ या क्रमांकावर किंवा शहरातील सीएनजी पंपावर संपर्क साधावा, असे आवाहनही संतोष सोनटक्के त्यांनी केले.