सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) डिंगणे-धनगरवाडी येथे लागलेल्या आगीत सुमारे साडेतीनशे एकरातील बागायती जळून खाक झाली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास लागलेली ही आग डिंगणे-धनगरवाडी येथून मोरगाव व डेगवे येथील बागायतीमध्येही शिरली. आग विझविण्यासाठी डिंगणे गाव एकवटला. त्यांच्या मदतीला शेजारील गावांतील ग्रामस्थही सरसावले. मात्र सकाळी साडेअकरा वाजता कळवूनही आपत्ती व्यवस्थापनकडून मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. अग्निशमन बंब दुपारी तीन वाजता दाखल झाला.
डिंगणे-धनगरवाडी परिसारात डिंगणे, डेगवे, मोरगाववासीयांच्या काजू बागायती आहेत. अगदी गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर या काजू बागायती आहेत. नेहमीप्रमाणे येथील शेतकरी काजू बागायतीत काम करायला गेले होते. काही शेतकरी काम आटोपून घरी परतत असताना मोठय़ा प्रमाणात आग लागल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी गावात दिली. आग लागल्याचे समजताच गावातील सर्वच मंडळी आग विझविण्यासाठी धनगरवाडी माळरानावर धावली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेकडो ग्रामस्थांनी झाडांच्या फांद्याच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. बांदा पोलीस कर्मचारी सुहास राणेही त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, आगीचा रुद्रावतार पाहता जीवावरही बेतू शकले असते. अशा परिस्थितीही येथील गाववासीयांनी आपल्या आणि शेजारांच्या बागायती वाचविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न केले.
याबाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी मोबाईलद्वारे सावंतवाडी अग्निशमनदलाला दिली. त्या ठिकाणचा बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वेंगुर्ले नगर परिषदेला कळविण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी आग विझविली, तरी बंब त्या ठिकाणी पोहोचला नव्हता. बांद्यापर्यंत आगीचा धूर दिसूनही कोणतीच आपत्ती व्यवस्था त्या ठिकाणी पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.