पुणे – सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पद्मावतीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत, आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री दिपाली सय्यद, रामभाऊ जगदाळे, अभिनेत्री करिश्मा वाबळे, शितल पाटील, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, अॅड.शार्दुल जाधवर यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात ॠतुजा भोसले यांना क्रीडा भूषण, जगन्नाथ चटे यांना कृषी भूषण, झुबरेपा काझी यांना शौर्य भूषण, प्रतिक चिंदरकर यांना सोलापूर भूषण, अभिनेत्री रोहिणी माने यांना कला गौरव, हरिष गुळीग यांना कार्य वैभव भूषण, मंजूषा काटकर यांना शिक्षणव्रती, पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु एन.एस.उमराणी यांना सोलापूर कर्मयोगीपुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मेघराजराजे भोसले म्हणाले, पुण्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना पुणे रत्न कार्यवैभव हे विशेष पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये अभय येतावडेकर यांना कला व सुशोभिकरण, राज काझी यांना पत्रकारिता, एम.ए.हुसेन यांना सामाजिक सेवा, जगन्नाथ लडकत यांना सामाजिक कार्य, अनिल गुंजाळ यांना कलाक्रीडा भूषण, अर्जुन सालेकर यांना कलागौरव, डॉ.राजन पाटील यांना संजीवन, दत्तात्रय शिंदे यांना कर्तव्यदक्ष पोलीस, संगीता पुणेकर यांना लोककला, धनंजय कोकणे यांना पर्यावरण संतुलन व जीवनरक्षा, गणेश जगताप यांना वर्दीतील माणुसकी, दिपाली सय्यद यांना सिनेनाटयकला, गोवर्धन दोलताडे यांना सिने-नाटय निर्मीती, संध्या सोनावणे यांना शिक्षणव्रती आणि योगेश कदम यांना विश्वकर्मा अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. प्रतिक इव्हेंट तर्फे कलारंग हा हिंदी-मराठी गीतांचा सुरेल नजराणा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.