ना.प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन; आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन
पुणे – “लोकशाहीमध्ये सर्वाना उत्कर्षाची संधी मिळते. रेल्वे स्टेशनवर चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान होते. दलित समाजातून येणारी व्यक्ती राष्टपती होते, तुमच्यातील प्रत्येकजण चांगला राजकारणी बनू शकेल. युवकांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत आपल्यातील जिद्ध, मेहनत, प्रतिभा आणि चिकाटीच्या जोरावर देशाचे भवितव्य घडविण्यासाठी योगदान द्यावे”, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी परिसरात आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ना.प्रकाश जावडेकर बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, आध्यात्मिक गुरू परम पुज्य स्वामी चिदानंद सरस्वती, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, उद्योजक राजीव बजाज, उद्योजक नाणिक रूपानी, हरियाणातील खासदार दुष्यन्त चौटाला, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व प्रमुख निमंत्रक व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. जय गोरे, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. दीपक आपटे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाई शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती डी. एच. शंकरमूर्ती यांना ’आदर्श सभापती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल वूमन्स पार्लमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांच्या सहकार्याने ही संसद भरवण्यात आली असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.
ना.प्रकाश जावडेकर म्हणाले, कोणत्याही प्रकारची घराण्याची परंपरा, पैशाचे पाठबळ किंवा मनगटशाही नसतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या उदाहरणापासून प्रेरणा घेऊन युवकांनी राजकारणात यावे. गुणवत्ता आणि मेहनत यांच्या जोरावर तेही उच्चपद प्राप्त करू शकतील. अर्थात राजकारण म्हणजे मखमली गादीवर आराम करण्याची गोष्ट नाही हेही त्यांनी लक्षात ठेवावे. २५-२५, ३०-३० वर्षे अखंडपणे प्रयत्न केल्यानंतरच त्यांना काही फळ मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या विकासासाठी जोमाने प्रयत्न करीत आहे. दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, संप्रदायवाद, अस्वच्छता यापासून भारताला मुक्त करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. पाच वर्षात ही सर्व उद्दिष्टेे पूर्ण करावयाची असून, त्यामध्ये वाढता लोकसहभाग समाधानकारक आणि प्रेरक आहे. पारदर्शक कारभारासाठी डिजिटल इंडिया, कॅशलेस सारख्या अनेक योजना आणल्या आहेत. लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात लाभ मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. आज देशासमोर अनेक आव्हाने आहेत. तशाच संधीही आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य घडवू पाहणार्या युवकांनी राजकारणात सक्रिय सहभागी झाले पाहिजे.
मोदींच्या ’सबका साथ, सबका विकास’ याप्रमाणे आम्ही ’सर्वांसाठी शिक्षण, चांगले शिक्षण’ हा मंत्र घेऊन काम करीत आहोत. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल करीत आहोत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुधारण्यासाठी महाविद्यालयांप्रमाणे शाळांचेही ’नॅक’सारख्या संस्थांकडून मूल्यांकन केले जाणार आहे. शिक्षणात संशोधन, नाविन्य यावर भर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोजगारक्षम, कौशल्यपूर्ण शिक्षण समाजाला मिळाले, तर देशाचा विकास गतीने होईल, असेही प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
ना.विनोद तावडे म्हणाले, युवाशक्तीला राष्ट्रशक्ती बनविण्यासाठी भारतीय छात्र संसद हे अतिशय उपयुक्त व्यासपीठ आहे. राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि त्याकडे चांगले करिअर म्हणून पाहण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर भारतीय राजकारण सेवा अर्थात इंडियन पोलिटिकल सर्व्हिस (आयपीएस) आणली पाहिजे. युवाशक्तीला कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर करून आपल्यातील प्रतिभा, राजकारणी गुण इ. पारखले पाहिजेत. विद्यार्थ्यांतील गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.
शिवराज पाटील म्हणाले, माणूस घडविण्याचे शिक्षण आजच्या युवापिढीला देणे गरजेचे आहे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथे शिक्षण दिले जात आहे. त्यातून भारतीय संस्कृतीचा प्रसार होत असून, या नीतिमूल्यांना अंगीकारून युवा पिढी राजकारणात आली, तर देशाचा विकास झपाट्याने होईल. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसद, विधानसभेत, विधानपरिषदेत लोकप्रतिनिधी चर्चा करतात. कायदे बनवितात. मात्र, तेथील गोंधळ पाहिल्यानंतर अनेकदा चीड येते. सुसंस्कृत राजकारणी कमी असल्याची जाणीव होते. लोकशाहीच्या या प्रक्रियेत सर्वांगीण ज्ञान असलेले आणि सुसंस्कृत प्रतिनिधी राजकारणात यायला हवेत. त्यासाठी एमआयटी आणि भारतीय छात्र संसद युवकांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत आहेत. युवकांनी राज्यघटना, संसदेचे कामकाज इ. समजून घेतले पाहिजे.
डॉ. विजय भटकर म्हणाले, आपण प्रत्येकजण सरकारच्या निर्णयावर, राजकारणावर टीका करतो. परंतु, यामध्ये आपण सहभागी होत नाही. आपलो लोकशाही बळकट करायची असेल, तर प्रत्येकाने मी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. भारताला संस्कृती, परंपरेचा मोठा वारसा आहे. याचा योग्य लाभ घेत शालेय आणि उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. त्यातून देशाचा विकास साधला जाईल. राजकारण हा केवळ पुस्तकी शिक्षणातून नव्हे, अनुभवातून शिकण्याचा भाग आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात येऊन लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे. ग्रामीण-शहरी भागात प्रगती साधण्याचे हे योग्य माध्यम आहे.
मा.चिदानंद सरस्वती म्हणाले, भारत देश म्हणजे पृथ्वीचा केवळ एखादा तुकडा नाही, तर शांतीचे पीठ आहे. सुपर कॉम्प्युटर आणि सुपर कल्चरचे ठिकाण आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशाला दिशा देण्याचे काम संतांनी केले असून, त्या भूमीत लोकशाहीच्या सक्षमीकरणाची चर्चा होते. देशाच्या कानाकोपर्यातून युवक येथे आले आहेत, ही आनंदाची बाब आहे. या युवाशक्तीला मूल्यांचे शिक्षण मिळाले तर येणारी पिढी देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देईल. एकात्मतेच्या भावनेतून प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. इंटरनेटपेक्षा इनरनेटचा आवाज ऐकला पाहिजे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या नावाने भारत ओळखला जातो. याच विचारांनी प्रेरित भारत देशाकडे सर्व जग आशेने पाहत आहे. एकविसावे शतक भारताचे असल्याचे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते. आज युवाशक्ती करीत असलेल्या कामगिरीकडे पाहिल्यावर विवेकानंदांचे भाकीत सत्यात उतरताना दिसत आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून काम केले पाहिजे. भारतीय अस्मिता युवा पिढीत जागविण्यासाठी एमआयटी प्रयत्न करीत आहे.
प्रा. राहुल कराड म्हणाले, राजकारणात चांगल्या लोकांनी यावे, यासाठी प्रोत्साहित करणारे हे भारतीय छात्र संसदेचे व्यासपीठ आहे. ही राजकारणाच्या सुधारणेची चळवळ आहे. ती व्यापक व्हायला हवी. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने या छात्र संसदेला राष्ट्रीय युवक महोत्सवाचा दर्जा द्यावा. वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीत अशा छात्र संसदा आयोजित करून लोकशाही प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. डी. एच. शंकरमूर्ती यांनी सत्काराला उत्तर दिले. पंडित हरिप्रसाद चौरसिया, राजीव बजाज, नानिक रूपानी. दुष्यन्त चौटाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट, नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन के