पुणे – पुण्यातील तळेगाव दाभाडे (ता.मावळ) येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत विनामुल्य महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये मुंबई व पुणे येथील प्रख्यात 902 वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. यासाठी 100 ओपीडी(तपासणी कक्ष) स्थापन करण्यात आले आहेत.
या शिबीरासाठी दिनांक 15 ते 20 जानेवारी या कालावधीत पूर्व तपासणी शिबीर सुरु असून यामध्ये आतापर्यंत 38 हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. रविवारी होणाऱ्या महाआरोग्य शिबीरात वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला,औषधोपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या ठिकाणी रक्तदान शिबीरही घेण्यात येणार आहे. यावेळी नेत्ररोग, ह्दयरोग, कर्करोग, अस्थिव्यंगोपचार, मेंदुरोग, त्वचा व गुप्त रोग, श्वसनविकार व क्षयरोग, दंतरोग, जेनेटिक विकार आदि आजारांवर तपासणी व औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच आयुर्वेद, योग, पंचकर्म, होमीओपॅथी उपचारही केले जातील तसेच सर्वप्रकारच्या रक्त तपासण्या, एक्सरे सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅन आदी तपासण्या वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार संजय भेगडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.