पुणे – देशाच्या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य ते स्थान मिळवून देण्यासाठी 73 वी आणि 74 वी घटना दुरूस्ती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिकार मिळवून देण्यात या घटना दुरूस्तीचा मोठा वाटा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया असून त्यांना अधिक बळकटी मिळवून देण्यासाठी विचारमंथनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केले.
“74 व्या घटना दुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षा”निमित्त येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)च्या संवाद सभागृहात राज्य निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व महानगरपालिका पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रगती व पुढील दिशा” या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, लोकशाही हीच आपल्या देशाची ताकत आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रणाली राबविणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था याच लोकशाहीचा पाया आहेत. या लोकशाहीच्या पायाला अधिक बळकट बनविण्याचे काम घटनादुरूस्तीने केले आहे. गेल्या 25 वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा लेखाजोखा आणि पुढील 25 वर्षातील वाटचाल यावर या परिषदेत विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे. योग्य वातावरणात झालेल्या निवडणुका हाच लोकशाहीचा आत्मा आहे. या घटनादुरूस्तीच्या माध्यमातून ही प्रक्रीया अधिक सशक्त झाली आहे. सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केले पाहिजे. सामान्य नागरिक हाच त्याच्या विकास प्रक्रीयेचा केंद्र बिंदू असावा अशी अपेक्षा श्री. बापट यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. या परिषदेला पुणे विभागातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
लोकराज्यच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
74 व्या घटनादुरूस्तीच्या निमित्ताने आयोजित विभागीय परिषदेच्या कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. बापट यांनी लोकराज्यच्या अंकाचे अवलोकन केले. लोकराज्यच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येत असलेल्या विशेष अंकाचे कौतुक करून लोकराज्यच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.