पुणे – अंधांमधील आत्मविश्वास हा समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी येथे केले. मा. उपमहापौर आबा बागुल व पुणे ब्लाईंड्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंध विद्यार्थीनी, भगिनींसमवेत हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी रश्मी शुक्ला बोलत होत्या.
यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री आबा बागुल, पुणे शहर जिल्हा काँगे्रस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, हर्षदा बागुल, पुणे ब्लाईड्स असोसिएशनचे अध्यक्ष परवेज बिलीमोरीया, सेक्रेटरी किशोरभाई व्होरा, अॅड. चंद्रशेखर पिंगळे, कश्मीरा ठाकर, डॉ. सायली कुलकर्णी, नितीन बोरा, गोरख मरळ, सुरेश कांबळे, हेराल्ड मेसी, ज्योती अरविंद, महेश ढवळे, दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या सर्व महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, संकट कधी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संकटाला सामोरे जाताना स्वत:वरील विश्वास हाच महत्त्वाचा असतो. आज अंध महिला भगिनी स्वत:ची कामे स्वत: करत आहेत. जरी डोळे नसले तरी त्यांच्यातील आत्मविश्वासावर त्या जीवन जगत आहेत.
त्यांच्यातील हा आत्मविश्वासच संपूर्ण समाजाला दिशादर्शक ठरेल, असा आहे. आज हा कार्यक्रम येथे पार पडत आहे. ज्यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केले अशा संस्थांचे जाळे आणखीन व्यापक होणे गरजेचे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल म्हणाल्या की, परमेश्वराने सर्व ग्रहांमध्ये पृथ्वी अतिशय सुंंदर बनविली आहे. आईच्या रुपात आपण सर्वजण पृथ्वीकडे पाहतो आणि जीवनात ही स्त्री ही सर्वसमावेशक आहे. आपल्या भगिनी किंवा आपण जरी अंध असलो तरी दैवी शक्ती आहे. म्हणजेच ईश्वर आपल्या बरोबर आहे. कोणत्याही संकटाला मात करण्यासाठी आपल्यातील आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. असेही त्या म्हणाल्या.
हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये पोलिस आयुक्तांसमवेत आणि महिला पदाधिकार्यांबरोबर अंध भगिनी-विद्यार्थीनींनी संवाद साधला. ऑर्केटस्ट्राचा मनमुराद आनंद लुटताना काही काळ त्या अधंत्वही विसरून गेल्या. आकर्षक भेटवस्तुंचे वाण, स्नेहभोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. चैतन्य हास्य योग क्लबचे पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते.