पुणे – घरातील ओला कचरा एकत्रित करून कंपोस्ट कसा करायचा, पाणी वाचविण्यासाठी आपल्याच घरापासून कशी सुरूवात करायची, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचविता पारंपरिक पध्दतीनेच निसर्गातील गोष्टी वापरून कशा प्रकारे घर बांधणी करायची, अशी माहिती देत कचरा व्यवस्थापनाचे तंत्र तरुणांनी उपस्थितांसमोर उलगडले. कचरा समस्या हा सध्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन शिकणे ही काळाची गरज आहे, असा सूर चर्चासत्रातून उमटला.
सूत्रधारतर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी पत्रकार नगर येथील कलाछाया येथे दर महिन्याला संवाद सत्राचे आयोजन केले जाते. यावेळी नेचर अॅण्ड आय या विषयांतर्गत चिन्मय लोकरे, उद्यम गोखले, धु्रवांग हिंगमिरे, यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर संवाद साधण्यात आला. सूत्रधारच्या मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व यावेळी नृत्यातून उलगडले.
उद्यम गोखले म्हणाले, पाणी वाचविण्यासाठी आपण व्यक्तीश: किती प्रयत्न करतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी ज्या जमिनीतून पाणी काढतो त्या जमिनीला मला पाणी द्यायचे आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. घरातील पाणी बचतीसाठी काय उपाय आहेत, हे देखील पहायला हवे.
चिन्मय लोकरे म्हणाले, सध्या कचरा ही गंभीर समस्या बनत आहे. विविध उपाययोजनांच्या आधारे किमान स्वत:च्या घरातील कचºयाचे तुम्ही व्यवस्थापन करु शकता. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेचा म्हणजे टेरेसचा वापर करुन घरातील ओला कचरा साठवून तिथे कंपोस्टींग करून भाजीपाला आणि अन्य रोपे देखील लावता येईल.