पुणे – नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देवून महाआरोग्य शिबिरांचे राज्यभरात आयोजन करण्यात येणार असून ही शिबिरे राज्याच्या ग्रामीण भागात घेण्यासाठी भर देण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
तळेगाव दाभाडे, ता.मावळ येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी श्री. महाजन बोलत होते. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आमदार संजय भेगडे, आमदार माधुरी मिसाळ, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.के. शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, आरोग्यदूत रामेश्वर नाईक आदी मान्यवर उपस्थित् होते.
यावेळी श्री. महाजन म्हणाले, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, या शिबिरात तपासणी झालेल्या ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील. यासाठीचा खर्च शासन, सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात येईल.
बापट म्हणाले, सामान्य नागरिक पैशांअभावी रुग्णालयात जाण्यासाठी टाळाटाळ करतात. अशा गरजू नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल. आरोग्य सेवा देण्याचे काम अखंड सुरु ठेवणार असून इतरांनीही या सेवेमध्ये सहभागी व्हावे. मावळ तालुक्यात डॉ. केशव हेडगेवार रुग्णालय उभारण्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करु. या कामासाठी एक लाख रुपये व एक रुग्णवाहिका भेट देण्यात येईल.
यावेळी आमदार संजय भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यात दि. 15 ते 20 जानेवारी 2018 या कालावधीत विविध 20 ठिकाणी आरोग्य शिबिर घेवून सुमारे 70 हजार नागरिकांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. शिबिरातील प्रत्येक गरजू रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देवून आरोग्य विभागासाठी अधिकाधिक निधीची तरतूद होणे आवश्यक आहे.
डॉ.अजय चंदनवाले यांनी प्रास्ताविकातून अशा प्रकारची आरोग्य शिबिरे देशपातळीवर होणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी दानशूर व्यक्तींनी शिबिरासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. आरोग्यदूत रामेश्वर नाईक व शिबिरासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आभार गणेश भेगडे यांनी मानले.