पुणे
महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’च्या माध्यमातून महिलांमध्ये बचतीबाबतची सजगता वाढीस लागावी आणि प्रामुख्याने लघु आणि सूक्ष्म महिला उद्योजकांना अर्थसहाय्य मिळावे, अशी अपेक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी आज व्यक्त केली.
‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि.’च्या सहकारनगर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी आमदार मेधा कुळकर्णी, मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेतील प्रथम उपविजेत्या श्रेया कक्कड आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा निलीमा बावणे होत्या.
माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘महिलांच्या भिशीमधून सुरुवात झालेली एक बचत संस्था मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’ इतकी मोठी होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हे यश मिळवणे निश्चितच अवघड आहे. या मल्टीस्टेट को ऑप सोसायटी च्या पुण्यामध्ये पाच शाखा झाल्या आहेत.
महिलांमध्ये उपजतच सतर्कता जास्त असते. संभाव्य संकटाला तोंड देण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळेच त्यांच्यात बचतीचा स्वभावही सहाजिकच असतो. याच गुणाच्या आधारे ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट’चे पुण्यातील काम वेगात सुरू आहे.
देशात जेंव्हा खासगी बँकांचे प्रमाण वाढू लागले त्यापुढे सहकारी बँका आणि छोट्या पतसंस्था कोलमडून पडू लागल्या होत्या. मात्र थोडा अभ्यास केल्यावर मोठ्या खासगी बँकांमधून छुपे व्याजदर ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आले. म्हणूनच सहकारी तत्वारील छोट्या बँकांवरील विश्वास आता पुन्हा वाढू लागला आहे. ग्राहकांना आपलेपणाने सेवा देणाऱ्या या बँकेचे निश्चितच स्वागत आहे. सूक्ष्म उद्योगांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देऊन प्रामुख्याने उद्योजक महिलांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केली.
‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी.’च्या लॉकर व्यवस्थेचे उद्घाटन आमदार मेधा कुळकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मेधा कुळकर्णी यांनीही दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को. ऑप. ला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला अनुसरून ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’चे काम सुरु आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. जनतेचे आर्थिक व्यवहार बँकांमार्फत व्हावे यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून महिलांसाठी बँक सुरु करण्याचा महिलांचाच हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ हे सरकारचे ब्रीद या बँकेच्या कामातून जपले जाईल, अशी आशा आहे.
मिसस इंडिया सौंदर्य स्पर्धेतील प्रथम उपविजेत्या श्रेया कक्कड यांनीही याप्रसंगी बँकेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी च्या अध्यक्षा नीलीमा बावणे यांनी संस्थेच्या प्रगतीबाबतची माहिती सांगितली. ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’ ही 24 वर्षांपूर्वी नागपूर येथे स्थापन झाली असून बँकेच्या 28शाखा कार्यरत आहेत. सहकारनगर येथील ही 29 वी आणि पुण्यातील पाचवी शाखा आहे. पुण्यामध्ये सदाशिव पेठ, कोथरुड, सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर येथे शाखा सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत बँकेच्या 1200 कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत.
या प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार किशोर बावणे, विभागीय प्रमुख चंद्रकांत दिधडे, असिस्टंट चीफ मॅनेजर चंद्रशेखर वसुले, शाखा प्रमुख दीक्षित, विलास जोशी, मधुरा कुलकर्णी आणि रसिका सप्रे आदी उपस्थित होते. बँकेच्या उपाध्यक्षा सारिका पेंडसे यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर संचालिका वृंदा शेंडगे यांनी आभार प्रदर्शन केले.