बाळा कदम
दक्षिण रत्नागिरीमधील सह्याद्री पर्यटनाला जाताना मराठी राज्यासाठी प्राणाची पर्वा न करता निधडय़ा छातीने लढणा-या छत्रपती संभाजी राजेंच्या संगमेश्वर कसबा येथे संभाजी स्तंभाला नतमस्तक होऊन शिवशंभूचे अधिष्ठान असलेले मार्लेश्वर, सुरक्षित आंबा घाट, अणुस्कुरा घाट, पांडवकालीन लेणी, उगवाई मंदिर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर गाव कोलधे आणि सासर जवळच्याच नेवाळकर कुटुंबातील कोटगावमध्ये आहे ते पाहिले. राजापूरची गंगा, धुतपापेश्वर, उन्हाळा अशी ही पावनभूमी खरोखरच समृद्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये प्रचितगड, भवानीगड किल्ल्याबरोबरच संभाजी महाराजांची समाधी, संभाजी स्तंभ आणि कर्णेश्वर मंदिर या स्थळांना पर्यटनदृष्टय़ा अनेक जण भेटी देतात. यापैकी शहराच्या आतील भागात असलेले कर्णेश्वराचे मंदिर खरोखरच पुरातन काळाची आठवण करून देते. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याची आख्यायिका असली तरी मंदिराची शैली, त्याच्या कळसाची रचना पाहता हे मंदिर दक्षिणेकडील राजा कर्ण याने बांधले असल्याचा निष्कर्ष काढला जातो.
उत्कृष्ट कोरीव काम, बारीक नक्षी आणि जुनाट काळपटपणा यामुळे इतिहास आणि पुरातनविषयी प्रेम असणारा पर्यटक या मंदिराच्या अक्षरश: प्रेमात पडतो. बाजूलाच एक छोटंसं गणेश मंदिर आहे. या मंदिरात बसून समोरचं कर्णेश्वर मंदिर पाहतच बसावंसं वाटतं. येथून देवरूखवरून मार्लेश्वरला जाताना देवरूखमध्ये असलेला द्विभूज गणेश आणि वेदभवन पाहण्याचा आम्हाला योग आला.
देशातील ही चौथी द्विभूज गणेश मूर्ती आहे. पूर्वी हा भाग अतिशय सुनसान होता. लोक इथे यायलाही घाबरायचे. मात्र, प्रा. खापार्डे नामक गणेशभक्ताने सात्विक भावनेतून ही मूर्ती मध्य प्रदेशातून आणली आणि या जागी त्या मूर्तीची स्थापना करून मंदिर बांधले. केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील देवरूख या ठिकाणी अशा प्रकारच्या द्विभूज गणेश मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्तीच्या मागच्या भागात तळामध्ये गजानन महाराजांची सुबक मूर्ती पाहायला मिळते.
मंदिराच्या बाजूलाच त्या परिसरामध्ये वेदभवन आहे. इथे ७ वष्रे ब्राह्मण मुलांना शिक्षण दिले जाते. १३ वर्षापूर्वी हे वेदभवन सुरू झाले. दरम्यान, थोडं पुढे गेल्यावर सिद्धिविनायकाचं मंदिर लागतं. पंतजोशी यांनी २५० वर्षापूर्वी मिळालेल्या चांदीच्या मूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. आजही येथील उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो, असं येथील पुजारी बाळू घाणेकर यांनी सांगितलं. हा परिसर खरोखरच मनाला भावतो.इथून मार्लेश्वरकडे जाताना सिद्धिविनायक मंदिरापासून थोडंसं पुढे सोळजाई देवीचं मंदिर दिसतं.
देवरूखवासीयांची ही ग्रामदेवता! इथून मार्लेश्वर २० कि. मी. अंतरावर आहे. मधे लागणा-या लिंबेराच्या घाटातून प्रवेश करताना खोल भागात बिबटय़ांचंही दर्शन घडतं म्हणे! सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा पाहताना भान हरपून जातं. सप्तेश्वर, महिपतगड, डाव्या बाजूला सर्वात वरती टिकलेश्वर हे शंकराचे स्थान आदी स्थळे या घाटात दुरून पाहायला मिळतात. सह्याद्री दर्शनाचा हिरवागार आनंद घेत घेत मार्लेश्वर जवळ येतं आणि मग मनात ‘ॐ नम: शिवाय’ जप सुरू होतो. येथेही धार्मिक आणि निसर्गाचा आविष्कार आम्हाला पाहायला मिळाला.
श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे सहय़ाद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकराचे स्वयंभू स्थान आहे. पायथ्यापासून वर जायला बांधीव पाय-या आहेत. सातशे पाय-या चढून वर जाताना मार्लेश्वराच्या दर्शनाची ओढ असल्याने आणि आजूबाजूचा निसर्ग, माकडांच्या लीला पाहताना अजिबात थकवा जाणवत नाही. एका बाजूला घनदाट जंगल आणि दुस-या बाजूला खोल द-या पाहताना ही वनराई मोहून टाकते. वर गेल्यावर एका गुहेत शंकराची पिंडी आहे. या गुहेत सापही फिरतात. मात्र, त्यांचा कुणाला त्रास झालेला ऐकिवात नाही.
देवळाच्या खालच्या बाजूला वाहणा-या नदीचा उगम २०० ते २५० फूट उंचीवरून पडणा-या धबधब्यातून होतो. या धबधब्याला धारेश्वर म्हणतात. मकरसंक्रांतीला व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. निसर्गरम्य ठिकाणचे हे जागृत देवस्थान पाहायला भाविक पर्यटकांची सतत रीघ असते. मार्लेश्वरचे दर्शन घेऊन लांज्याला जाण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जाणारा आंबा घाट पाहणं हे स्वर्गसुख अनुभवण्याचा आनंद कुठलाही पर्यटक सोडणार नाही.
अर्थात आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. खडी कोळवण, ओजरे बुद्रुक, खडी ओजरे ही छोटी गावे घेत आंबा घाट सुरू होतो आणि डोळय़ांचे अक्षरश: पारणे फिटते. आंबा घाटातील हा १० कि. मी. रस्ता म्हणजे परमेश्वराने सर्व हातांनी कोकणाला दिलेली निसर्गाची उधळण आहे. पक्क्या आणि रुंद डांबरी रस्त्यावरून झुपकेदार वळणे घेत सहय़ाद्रीच्या पर्वतरांगा पाहताना अक्षरश: भान हरपून जातं. पाऊस संपून गेल्यावर पावसाने सर्वत्र हिरव्यागार रूपात ठेवलेली ही निशाणी अनुभवताना नकळत त्या पर्जन्यराजाचेही आपण आभार मानतो. मध्येच कुठेतरी एखाद्या ढगाच्या सावलीचा मोठा ठिपका, त्याच्या बाजूने उन्हाने चकाकणारा गारवा खूप वेळ बघत राहावासा वाटतो.
घाट चढताना अनुभवलेला निसर्गघाट उतरतानाही तोच होता. पण त्यावेळी तो अगदी नवाच वाटला. हा घाट उतरून लांज्याकडे जाताना कोंडगांव येथे दादा गांधींच्या हॉटेलात जेवण करण्याचा आम्हाला योग आला. उत्तम शाकाहारी जेवण करून आम्ही पुन्हा निसर्गाची सोबत घेत लांज्याची वाट धरली. मध्येच काळा ढग भरून आला. पाच मिनिटे त्याने झाडाझुडपांना यथेच्छ न्हाऊ घातलं.
भिजलेल्या निसर्गाला मग कोरडं करण्यासाठी सूर्यनारायणाने आपली सोनेरी किरणं धाडली. पुढे चकाकणारी किरणंच किरणं होती. लांज्याला कोत्रेंच्या हॉटेलात प्रसिद्ध खव्याचे लाडू आणि चहा घेतल्यावर या तालुक्यातील १२ कि. मी. वर असणा-या जावडे येथील एकखांबी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आम्ही गेलो.
जावडे येथील रावजी नगरमध्ये निसर्गरम्य वातावरणात हे छोटंसं गणेश मंदिर आहे. सिव्हिल इंजिनीयर असणा-या राजेश शिंदे यांनी मनोभावनेने हे मंदिर आपल्या व्यवसायाच्या विचारांतून वेगळय़ा पद्धतीने बांधले. साधारण सहा ते सात फूट उंचीच्या गोलाकार खांबावर हे मंदिर उभारलेले आहे. वर जाण्यासाठी बाजूने गोलाकार जिना ठेवण्यात आला आहे. गडद लाल रंगाचे हे मंदिर निसर्गाच्या हिरवाईत आपल्या वेगळेपणाने उठून दिसते.
तेथूनच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्वजांचे मूळ गाव कोलधे आणि त्याच्या बाजूलाच थोडं पुढे तिच्या सासरच्या पूर्वजांचे मूळ गाव असलेले कोटगांव पाहिले. प्रत्यक्ष राणी लक्ष्मीबाईंचा या गावांशी संपर्क आला नाही. मात्र, तिच्या माहेरच्या तांबे घराण्याचे वंशज आणि सासरच्या नेवळेकर घराण्याचे वंशज या गावामध्ये राहतात. दरम्यान, त्यांचे सासर असलेल्या कोटगांवातील राजू नेवळेकर यांनी राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक बांधण्याची इच्छा व्यक्त केली. आज राणींच्या मूळ घराचा चौथरा इथे पाहायला मिळतो. तसेच नेवळेकर घराण्याची देवता लक्ष्मीकांत यांचे जुने मंदिरही दिसते.
लांजामध्ये समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर असणारे ‘माचाळ’ नावाचे थंड हवेचे एक गाव आहे. मात्र, पायथ्यापासून वर गावात जायला अडीच तास खडतर पायपीट करावी लागते. हा रस्ता पक्क्या स्वरूपात बांधण्यात आला तर हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल. त्यादृष्टीने काहींचे प्रयत्नही चालू आहेत. सह्याद्री पर्यटनाच्या दृष्टीने घाटमाथे महत्त्वपूर्ण असल्याने लांजावरून राजापूरकडे निघण्यापूर्वी ओणीच्या मागे साधारण दीड कि. मी. वर असलेल्या फाटय़ावरून पाचलमार्गे आम्ही अणुस्कुरा घाटात गेलो.
या घाटाचा कच्चा रस्ता सोडला तर घाटातून दिसणारी वनश्री, रस्त्याची नागमोडी वळणे, सहय़ाद्रीचे कडे नक्कीच आपल्याला आनंद देऊन जातात. येरडव हद्दीत हा घाटरस्ता येतो. खालचा भाग राजापूर तालुक्यात, तर घाटमाथ्यावर कोल्हापूर जिल्हय़ातील शाहूवाडी तालुका येतो.
माथ्यावर पांडवांनी बांधलेले उगवाईचे मंदिर आहे. या रस्त्यावरून वर्दळ खूपच कमी आहे. मध्येच एखाद-दुसरी गाडी दिसते. सिंगल आणि कच्चा रस्ता असल्याने ही वाहतूक कमी आहे. एस. टी.च्या फक्त चार गाडय़ा या घाटातून जातात. पूर्वी या घाटातून बैलावरून वाहतूक चालायची. कोकणातील मासळी घाटावर आणि घाटावरचा गूळ खाली यायचा. वरच्या बाजूने असलेल्या परकी धबधब्याचे पाणी काजिर्डा गावात येते. हा धबधबा कोल्हापूर जिल्हय़ात येतो.
१० वर्षापूर्वी हा कच्चा घाटरस्ता होण्यापूर्वी अनेक वन्यप्राणी येथे दिसायचे. घाटरस्ता झाल्यावरही काही काळ हे प्राणी रस्त्यावर असत. अणुस्कुराघाटातील वनश्री पाहून आम्ही राजापूरला निघालो. इथे उन्हाळे म्हणून एक गाव आहे. तेथील गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. गावात शिरल्यावर डाव्या बाजूला महालक्ष्मीचं मंदिर लागतं. त्याच्या बाजूलाच पुढे सिमेंटचे बांधकाम करण्यात आले असून आतमध्ये गरम पाण्याचे झरे वाहताना दिसतात. हे गंधकयुक्त गरम पाणी वर्षभर वाहत असतं.
योगी ज्वालानाथ नावाचे सिद्धपुरुष या गावात फार वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांच्या भक्तीप्रतापामुळे हे झरे निर्माण झाल्याची कथा आहे. त्याच्याजवळच असलेली राजापूरची गंगा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. राजापूरपासून २ कि. मी. अंतरावर डावीकडे गंगातीर्थ आहे. मूळ प्रवेशद्वारासमोरच काशीकुंड आणि गोमुख आहे. त्याच्या बाजूलाच वटवृक्षाखाली मूळ कुंड दिसतं. या मूळ कुंडातूनच गंगेचं प्रथम आगमन होतं. गंगाजी साळुंके नावाच्या कुणबी समाजाच्या गृहस्थाने गंगामाईचं स्तवन करून ही गंगा आणली असं सांगितलं जातं. एकूण १४ कुंडांतून ही गंगा प्रकट होते. मात्र, गंगा आल्यावरच या परिसराला महत्त्व प्राप्त होतं.
इतर वेळी हा भाग सुनसान असतो. या पवित्र तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता सिंगल असून तो खराब झालेला आहे. त्याची दुरुस्ती व्हायला हवी. अरुंद रस्ता असल्याने गंगा येते तेव्हा मोठीच वाहतूक कोंडी होते. गंगेच्या वेळीच इथे भेट देण्यापेक्षा इतर वेळीही आवर्जून भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.
राजापूरवासीयांचे ग्रामदैवत श्रीदेव धूतपापेश्वर हे या तालुक्यातील आणखी एक धार्मिक पर्यटनस्थळ! हे एक प्राचीन मंदिर आहे. सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर बाजूच्या निसर्गामुळे अधिकच सुंदर दिसते. मंदिराशेजारी काळय़ा कातळावरून मृडानी नदीचा प्रवाह आहे. पावसाळय़ात हा धबधबा दुथडी भरून वाहत असतो. ज्या डोहात हे पाणी कोसळते, त्याला ‘कोटीतीर्थ’ म्हणतात. या मंदिराबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते.
जागृत देवस्थानाबरोबरच मंदिराच्या सभोवतालचा निसर्ग आणि धबधबा पाहण्यासाठी पर्यटक वर्षभर इथे येत असतात. अगदी संगमेश्वरपासून राजापूपर्यंतचा हा सहय़ाद्रीचा प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव होता. कडे-कपारी पाहताना यामध्ये दडलेली कोकणातील जागृत देवस्थाने, त्यांचा इतिहास ऐकताना ही कोकण भूमी खरोखरच समृद्ध असल्याचं जाणवतं.