बाल वयात वाचनाचे संस्कार आणि आम्ही

January 27th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

सुरेश शामराव ठाकूर

‘मुलांनो, ग्रंथ चावायचे नसतात रे, ग्रंथ वाचायचे असतात आणि ग्रंथ पोटात सुद्धा ठेवायचे नसतात. ते माणसाच्या ओठात हवे.’ काका काय बोलत होते त्याचा अर्थ तेवढासा आम्हाला त्यावेळी समजत नव्हता. पण ते प्रेमळपणाने बोलत होते. त्याचा आवाज आजोबांच्या प्रेमासारखा ओथंबलेला होता. म्हणून आम्हा दोघांना हायसे वाटले.
आमच्या शालेय जीवनात आमच्या आचरे गावात वीज नव्हती आणि त्यामुळेच आम्हाला लहानपणीच आमच्या छोटया गावात भरपूर वाचता आलं आणि भरपूर पाहता देखील आलं. शालेय जीवनात गावात वीज नसणे हे आमच्या दृष्टीने खरी इष्टापत्तीच ठरली.
वीज नसल्याने दूरदर्शन नाही, दूरदर्शन मालिका नाही आणि मालिकेचे उकडे नसल्याने श्री रामेश्वर वाचन मंदिराची बालसाहित्याची पुस्तके, गावात होणारी गावच्याच कलाकारांनी साकार केलेली दर्जेदार संगीत नाटके, श्री रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात अधूनमधून सादर होणारी दशावतारी नाटके हे तर आमच्या मनोरंजनाचे खरे मुलस्त्रोत !
श्रीरामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे सानिध्य अगदी उशाजवळ लाभणे हा आमच्या दृष्टीने दैवी योगायोगच. त्यामुळे मे महिना आणि दिवाळीची सुट्टी कधी पडते आणि वाचनालयात जाऊन पुस्तकांचा फडशा कसा पाडायला मिळतो. यात आम्हा बच्चे कंपनीत शर्यत लागलेली असायची.
सानेगुरुजींचे ‘श्यामची आई’ आणि ‘सुंदर सुंदर गोष्टी’, ना. धो. ताम्हणकरांचा ‘गोटया’, नाथमाधवांची ‘सावळया तांडेल’, भा.रा.भागवतांचा ‘फास्टर फे णे’ अशा एक ना अनेक पुस्तकांची आमच्याकडून पारायणे व्हायची. रॉबिन्स क्रुसो या पाश्चात्यवीराने आम्हाला वेडच लावले होते. चाणक्य, बिरबल, मुल्ला नसरुद्दीन, तेनालीरामन, नाना फडणीस यांच्या हुशारीच्या आणि हजरजबाबीपणाच्या कथा रात्री कंदिलाच्या काचा काळया पडेपर्यंत आम्ही वाचायचो.
त्या वयात सर्वात जादूची पुस्तके भारी आवडायची. जादूचा दिवा, जादूची चटई, जादूचा शंख सर्वाचे कथानक जरी सारखे असले तरी त्याची मौज घेण्याचा आनंद त्या वयात काही आगळाच असायचा. त्यातील राजकुमाराच्या भूमिकेत आम्ही आम्हालाच समजत असू. अर्धे राज्य आणि पूर्ण राजकन्या मिळवणारे आम्ही बालवाचकवीर शेवटी पुस्तक संपवून राजमंचक सोडून आईने शिवलेल्या मऊशार गोधडीत विसावत असू.
प्रत्यक्ष आणि कल्पना यातील पुसटही सीमारेषा आम्हाला त्यावेळी दिसून येत नव्हती. सगळया ‘अरेबियन नाईट’ बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस आणि बेडकांचा डराँव डराँव खर्ज या ताल संगीतात आम्ही उपभोगल्या होत्या. आणि म्हणूनच रात्री जादूची पुस्तके वाचत असताना स्वप्नात राक्षसाबरोबर तलवार घेऊन दोन हात करणारे आमचे हात सकाळी गोठयातील म्हैस सोडून त्याच हातात तलवारीऐवजी काठी घेऊन त्याच तंद्रीत आच-याचा माळरान गाठत असत. तरीपण त्या वाचन कल्पनेमुळे मिळालेलं सुख आणि समाधान याची तुलना आजच्या कोणत्याही भौतिक संपत्तीशी होऊ शकत नाही. खरोखर आमचे ते बालवाचनाचे दिवस म्हणजे अलीबाबाची गुहा होती. आणि त्याची लयलूट आम्ही यथेच्छ केली.
मे महिन्याचे दिवस तर आमच्या दृष्टीने वाचनाचा सुकाळू असायचा. सांबरीच्या घरासमोर असलेल्या पोस्टातून वाडीतील सर्वाची पत्रे वाटण्यासाठी घेतल्यावर आमचे पाय श्री रामेश्वर वाचन मंदिराकडे वळायचे. वाचनालयातून आमची वाचनाची भूक यथेच्छ भागवून घरी भरपूर पुस्तके आणायचो. त्यावेळी माझ्यासोबत माझ्याच वयाचा माझा आतेभाऊ बाळ अवसरे मुद्दाम गोरेगावहून आपली वाचनभूक भागविण्यासाठी चक्क महिनाभर आच-यात मुक्कामाला असायचा. त्याला मुंबईतही आच-यातल्या वाचनालयासारखी मुबलक पुस्तके मिळत नव्हती. म्हणून मोठी सुट्टी संपेपर्यंत त्याचा मुक्काम आच-यातच असायचा. मग आमच्यात वाचायची शर्यत लागायची.
त्याच दरम्यान श्री रामेश्वर वाचन मंदिरात काका दळवी नावाचे नवीन कडक शिस्तीचे गं्रथपाल आले. जवळजवळ पासष्ट ते सत्तर वयाचे, पांढरे स्वच्छ धोतर, लांब बाह्याचा तलम पांढरा शर्ट, जाड भिंगाचा चष्मा, डोक्यावर तुरळक केस आणि शोधक नजर या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक आगळीच भीती ते आल्यावर सर्व बालवाचकांपासून थोर वाचकांपर्यंत वाटू लागली.
अलीकडच्या काळात शेषन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर जी अनामिक भीती राज्यकर्ते आणि मतदारात निर्माण झाली होती, तशा प्रकारची भीती काका दळवी ऊर्फ बाबूराव दळवी यांच्याबद्दल सर्वाना वाटू लागली. आणि त्याला कारणही तसेच होते.
मुंबईत काका दळवी कुठल्या तरी कंपनीत शंभर दीडशे रुपयांवर कामाला होते. तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी गावी येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याकाळी अक्षरश: पन्नास ते पंचावन्न रुपयाच्या मानधनावर एक ग्रंथपाल म्हणून श्री रामेश्वर वाचनालयात नोकरी स्वीकारली.
नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले कडक निर्बंध त्वरित सुरू केले. एक वाचक-एक पुस्तक, आठ दिवसांच्यावर पुस्तक घरी राहिल्यास चार आणे दंड, शंभर रुपयाच्या वरील पुस्तके डिपॉझिट भरूनच मिळतील. (त्यावेळी पुस्तकांच्या किमती आतासारख्या भडकल्या नव्हत्या) आदी एक ना अनेक नियम त्यांनी कार्यकारिणीकडून मंजूर करून अंमलात आणले आणि राबवायलाही सुरुवात केली. त्यांच्या कडक नियमांचा फटका आम्हा बालवाचकांपासून थोर वाचकांपर्यंत आणि अध्यक्षांपासून सेक्रेटरीपर्यंत सर्वानाच धक्का बसला होता.
पण काका दळवींचे नियम मोडण्याची ताकद कोणातही नव्हती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा प्रभावच सर्व वाचकांवर पडला होता. कारण ते जे करत होते ते ग्रंथप्रेमींसाठी आणि ग्रंथालयासाठी. त्यांच्या नियमाचा एक फटका आम्हाला चांगलाच बसला. केवळ एकच पुस्तक घेऊन घरी परतावे लागे. ‘चतकोराने मला न सुख’अशी आमची अवस्था होऊ लागली. त्याचवेळी वाचनालयात टारझन या जंगलवीराच्या पुस्तकाचे एक ते दहा भाग आल्याची बातमी आम्हाला समजली. माझ्यात आणि बाळ अवसरेमध्ये ते भाग चार दिवसात वाचून काढण्याची जणू शर्यत लागली.
काका दळवींच्या नियमामुळे आम्हाला एकदम दहा भाग मिळणेही अशक्य होतं. कारण त्याचे शरीर कवडयाचे असले तरी त्यांची नजर घारीची होती. तरीपण सर्व नियमांना बगल देऊन टारझनचे दहाही भाग एकाच वेळी काकांची नजर चुकवून घरी आणण्याचा आणि त्याचा फडशा पाडून परत करण्याचा आम्ही दोघांनी साहसी बेत आखला. रॉबिन्स क्रुसो, सावळया तांडेल, ना. धो. ताम्हणकरांचा गोटया यांचे थोडे थोडे रक्त आमच्या बाहुत फुरफु रू लागले. घरूनच फूल शर्ट घालून तो निळया चड्डीत व्यवस्थित इन करून आम्ही अत्यंत सोज्वळ चेह-याने वाचन मंदिरात प्रवेश केला. ग्रंथांची का असेना चोरीच आमच्या हातून होणार होती. पाय थोडे-थोडे लटपटत होते. पुस्तके शोधून घेतो असे सांगून टारझनच एक-एक भाग हातात घेऊन काका दळवींची शोधक नजर चुकवून प्रत्येकी चार-चार टारझन आम्ही आमच्या पोटात व्यवस्थित बसविले. जणू काही झालेच असा आविर्भाव चेह-यावर आणून हातात एक-एक पुस्तक घेऊन आम्ही काका दळवींच्या समोरे सहीकरिता उभे ठाकलो. काका आमच्याकडे बघून क्षणभर थांबले आणि म्हणाले, ‘‘मुलांनो, तुम्ही दोघेही माझ्या बाजूच्या खुर्चीत बसा.’’
काका अचानक आज मोठया वाचकांचा मोठया सभासदांचा मान (गार्ड ऑफ ऑनर) का देत होते हे खुर्चीत बसल्याबरोबर आमच्या लक्षात आले. चार-चार टारझनच्या पुस्तकाने आमची पोटे चांगलीच टमटमीत दिसू लागली होती. काकांनी आमच्या पोटावरून अलगद हात फिरवताच आम्हाला ब्रह्मदंड आठवले.
‘ही बातमी आमच्या घरी समजल्यावर काय होईल?’ या कल्पनेनेच घशाला कोरड पडली. तोंडाला रामेश्वराचा मंत्रजप आणि पायाचे लटपटणे सुरूच होते. आणि त्याला काहीच इलाज नव्हता. कारण काकांच्या त्यावेळच्या सीसी कॅमे-यातून (जाड भिंगाच्या चष्म्यातून) सर्व यथासांग टिपलेले होते.
एवढयात काकांनी आमच्या पाठीवरून हात फिरवला. ‘मुलांनो, गं्रथ चावायचे नसतात रे, ग्रंथ वाचायचे असतात आणि गं्रथ पोटात सुद्धा ठेवायचे नसतात. ते माणसाच्या ओठात हवे.’ काका काय बोलत होते त्याचा अर्थ तेवढासा आम्हाला त्यावेळी समजत नव्हता. पण तेप्रेमळपणाने बोलत होते. त्याचा आवाज आजोबांच्या प्रेमासारखा ओथंबलेला होता. म्हणून आम्हा दोघांना हायसे वाटले.
आमचा रामेश्वर आम्हाला पावला होता. आम्ही दोघांनीही बुशशर्टची बटणे खोलून टारझनचे दहाही भाग काकांच्या टेबलावर सुपूर्त केले. काका पुढे म्हणाले, ‘हे जे तुम्ही कृत्य केले त्याला ग्रंथ वाचणे म्हणता येणार नाही. गं्रथ एक-एक वाचावा, मनन करावा. आपल्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व फार मोठे आहे. म्हणूनच मी ‘एक व्यक्ती-एक पुस्तक’ असा नियम केला. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही.
ग्रंथ तुमच्या पचनी पडावे म्हणूनच हा सारा खटाटोप. ग्रंथ हे आपले गुरू आहेत. त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आज तुम्ही के लेले हे कृत्य मी तुमच्या घरीच काय पण सेक्रेटरी बाळासाहेब गुरव यांनाही सांगणार नाही. पण आयुष्यभर असे वाचत चला की जे तुमच्या हळूहळू पचनी पडेल. आणि तुमचे शरीर व मनही धष्टपुष्ट होईल. मला मुंबईला तुटपुंज्या पगाराची नोकरी होती.
तरीही प्रत्येक पगारात मी एक-एक पुस्तक विकत घेतलं आणि माझं स्वत:च छोटं वाचनालय तयार केलं. मुंबईहून येताना ते छोटं वाचनालय मी माझ्याबरोबर आणलं. माझी मौलिक संपत्ती होती ती, आयुष्यबर कमावलेलं माझं धन होतं ते. इकडे आल्यावर अल्प मानधनात का असेना बाळासाहेबांकडून ग्रंथपालाचं हे काम मी मागून घेतलं आणि माझ्या स्वत:च्या वाचनालयाची सर्व पुस्तके या वाचनालयाला मी देणगीदाखल देऊन टाकली. तुम्हा दोघांना वाचनाची अतोनात आवड आहे. म्हणूनच तुम्हाला मला हे सर्व सांगावं असं वाटलं’’. काका दळवी बोलत असताना आमच्या डोळयातून अश्रू ओघळत होते. आम्ही डाव्या-उजव्या बाहीने ते पुसण्याचा केविलवााणा प्रयत्न करीत होतो. त्याचवेळी काका दळवी टारझनच्या त्या दहाही भागावर मारलेला आपला देणगीचा शिक्का आम्हाला दाखवत होते. त्या प्रत्येक पुस्तकावर लिहिलं होतं, ‘बाबूराव दळवी, मुंबई यांच्याकडून श्री रामेश्वर वाचनालयास सप्रेम भेट.’ मोठे झाल्यावर आवडलेली काही पुस्तके विकत घेऊन वाचत असताना, स्वत:चं छोटं वाचनालय घरी साकारत असताना मला काका दळवी आठवतात. ग्रंथ हे आपले गुरू होत पण काका दळवी माझे ‘महागुरू’ होते.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions