पुणे – गुड पॅरेंटिंगच्या नावाखाली आजचे पालक मुलांना अनेक नको असणाºया सुख सुविधा पुरवितात. त्यामुळे मुले आभासी माध्यमांची निवड करतात. आभासी माध्यमातून त्यांना आनंद मिळू लागला की त्याची सवय होऊ लागते आणि मग मुले आभासी माध्यमांच्या व्यसनाधिनतेकडे वळतात. याकरिता पालक म्हणून आपली भूमिका सक्षम करणे गरजेचे आहे. पालकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकले पाहिजे, तरच मुलांबरोबर सोशल मीडियाविषयी चर्चा करू शकतील व त्यातील फायदे तोटे सांगू शकतील, असे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे यांनी व्यक्त केले.
सार्थक वेलफेअर फाऊंडेशनतर्फे मीडिया अॅडिक्शन आणि आपली मुले याविषयावरील कार्यशाळेचे आयोजन एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यशाळेंतर्गत मीडिया अॅडिक्शन म्हणजे नक्की काय, ते कसे लागते, त्याचे परिणाम काय आणि त्यावर उपाय काय याचे मार्गदर्शन डॉ. साठे यांनी केले.
डॉ.शिरीषा साठे म्हणाल्या, मुलांची सुरक्षितता सोडली तर मुलांना त्यांच्या चुकांमधून अनुभव घ्याला शिकू देणे गरजेचे आहे. त्यांच्या चुकांकडे अनुभव म्हणून पहायला पालकांनी शिकायला हवे. त्यामुळे मुलांची निर्णय क्षमता वाढेल, जिथे अनुभव मिळणार असेल तिथे मुलांना सुरक्षित केले तर त्यांना जीवनातील प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत नाही. यासोबतच आभासी माध्यमांची व्यसनाधिनता तितकीच गंभीर असून त्याकडे सजगपणे पहायला हवे.
त्या पुढे म्हणाल्या, माध्यमांची व्यसनाधिनता हा आपल्या बदलत्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या जीवनशैलीतील बदल करणे, हा यावरील उपाय आहे. प्रत्येक घरामध्ये पालकांनी स्वत: देखील माध्यमांच्या वापरावर नियम घालून घ्यायला हवेत, असेही त्या म्हणाल्या. सार्थक वेलफेअर फाऊंडेशनतर्फे सोशल मीडिया अॅडिक्शन हा विषय जास्तीत जास्त पालक व मुले यांच्यापर्यत पोहोचविण्यात येणार आहे. त्याकरीता विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.