पुणे –
प्रत्येकाने आपल्या मनाशी संवाद साधूनच उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करावी. प्रत्येकांच्या मनस्थितीचा परिणाम शरीरावर होत असतो. जो मनाने संतुष्ठ असतो, तोच समोरच्यांना संतुष्ठ करु शकतो. डॉक्टरांकडून मिळणारा विश्वास आणि सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर बरे होतात. फक्त शरीराचे डॉक्टर न होता, रुग्णांच्या मनावर देखील उपचार करणारे डॉक्टर व्हावे असे मार्गदर्शन ब्रम्हाकुमारी शिवानीदिदी यांनी केले.
ब्रम्हाकुमारी मेडीकल विभागाच्या वतीने पुणे व सांगवीतील तनुश्री गर्भसंस्कार आणि सुविधा आयुर्वेद संशोधन संस्थेने जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित केलेल्या डॉक्टरांसाठी ‘मानसिक आजार औषध परिषद’(Mind Body Medicin Conference) बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन डॉ. केएच संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप काळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपिठावर निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानच्या भाग्यश्री पाटील, प्रतिभा मोडक, संयोजिका डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. सुभाष रानडे, डॉ.विजय डोहिफोडे, डॉ. शिरीष शेपाळ, डॉ. अनिल गुगळे, बनारसीभाई, सरितादिदी, डॉ. अरविंद संगमनेरकर आदी उपस्थित होते.
शिवानीदिदी म्हणाल्या की, जीवनात नको तिथे भावनिक गुंतवणूक केल्यास नकारात्मक परतावा मिळेल. मनापासून केलेल्या व्यवहारातून सकारात्मक परतावा मिळेल. जेंव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, व्देष नष्ट होईल. तेंव्हा आपल्या चहूबाजूला नेहमी सकारात्मक वलय निर्माण झाल्याचे दिसेल. डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात सकारात्मक विचारांव्दारे मंदीराप्रमाणे प्रसन्न वलय निर्माण करावे. येथे येणारा रुग्ण देवाप्रमाणे डॉक्टरांवर भरवसा ठेवून येईल व विश्वासाने पुर्ण बरा होऊन जाईल. रुग्णालय परिसरातील सकारात्मक ऊर्जा वलय व आदरयुक्त आदरातिथ्याने रुग्णाचे स्वागत झाल्यास 50 टक्के रुग्ण आपोआप बरा होईल. आज काल डॉक्टरच खुप ताण तणावाखाली त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणा-यांना नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. डॉक्टर रुग्णांच्या नात्यात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व प्राप्त झाल्याचे दिसते. एखादा व्यवसाय, उद्योग, नोकरी निवडताना शालेय गुणवत्तेत किती गुण आहेत यावरती ठरते. परंतू त्याच वेळी तो व्यवसाय, उद्योग, नोकरी करण्याची मानसिक तयारी, त्याबाबतचे संस्कार आपल्यात आहेत का? याचा प्रत्येकांनी विचार करावा. असे मार्गदर्शन शिवानीदिदी यांनी केले.
डॉ. केएस संचेती म्हणाले की, ज्या पध्दतीने संस्कृतीचा स्विकार करतो तो धर्म, मनापासून जे करतो ते अध्यात्म. मनाची निगा राखली तर ह्रदयाला देखील औषधांची गरज भासणार नाही.
प्रास्ताविक डॉ. सुप्रिया गुगळे, सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ, आभार सवितादिदी व पुजा शेपाळ यांनी मानले.