पुणे : ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा यांसारख्या व्याधींनी पुण्यातील अनेक रिक्षाचालक ग्रासले असल्याचे समोर आले आहे. स्वस्थ सारथी या ३ हजार सीएनजी रिक्षाचालकांसाठी राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरातील सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. वाढत्या प्रदूषणाचा फटका सामान्य पुणेकरांप्रमाणे रिक्षाचालकांनाही बसत असून सीएनजी वापर हा यावर उत्तम उपाय आहे. जास्तीत जास्त सीएनजी रिक्षा रस्त्यावर उतराव्या, याकरीता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून प्रयत्न सुरु असून रिक्षाचालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनने या शिबीराच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला होता.
शिवाजीनगर येथील रमारमण कार्यालयामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनतर्फे सीएनजी रिक्षाचालकांसाठी स्वस्थ सारथी या दहा दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचा समारोप पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, राजेश पांडे, हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अभय आपटे, सचिव सुनील पांडे, डॉ. सचिन देशपांडे, संजय राऊत, अशोक देवराजन, विवेक नायर, नितीन पवार, अभिनेत्री प्रतिक्षा जाधव आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३ रे वर्ष होते. डॉक्टर्स फाऊंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अॅन्ड मेडिसीन यांचे शिबिरासाठी सहाय्य मिळाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, रिक्षाचालक हा समाजातील महत्वाचा घटक असून तो सातत्याने कार्यरत असतो. त्यामुळे थोड्याफार प्रमाणावर त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष देखील होते. रक्षाचालकांची काळजी घेण्यासाठी अशाप्रकारच्या शिबीरांचे आयोजन केले पाहिजे. प्रदूषण रोखण्याकरीता सीएनजी कीटला देखील महानगरपालिकेकडून अनुदान देण्यात येते. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये सीएनजी कीटसाठी अनुदान देण्यात येते. यावर्षी देखील अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.
डॉ.सचिन देशपांडे म्हणाले, शिबीरामध्ये तब्बल २ हजार ७०० रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील ३२३ रिक्षाचालकांना ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा, अल्सर यांसारखे गुंतागुंतीचे आजार मोठया प्रमाणात आढळून आले आहेत. तर, ज्या रिक्षाचालकांना पूर्वीपासूनच विविध व्याधींनी ग्रासले होते, त्यांना देखील योग्य उपचार देण्यात आले. डोळ्यांच्या तपासणीमध्ये अनेक रिक्षाचालकांना मोतीबिंदूचा आजार आढळून आला.
ते पुढे म्हणाले, अशक्तपणा, ताण-तणाव हे रिक्षाचालकांना दैनंदिन जीवनात जाणवणा-या आजारांवर उपाय म्हणून योगा व प्राणायामाचे धडे देखील देण्यात आले. खाण्याच्या सवयी आणि शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित रहावे, याकरिता सर्व रिक्षाचालकांना सल्ला व समुपदेशन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. प्राजक्ता मांडके – परहर यांनी सूत्रसंचालन केल. वरुण जकातकर यांनी आभार मानले.
ह्रदयरोग, मधुमेह, अशक्तपणासारख्या व्याधींनी ग्रासले रिक्षाचालक – महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे शिबीर ; योगा व प्राणायामाचे धडे
Team TNV February 6th, 2018 Posted In: Pune Express
Team TNV