पुणे –
समाजाने बाजूला टाकलेल्या एका काळ्याकुट्ट कोप-यामध्ये आपले आयुष्य जगताना प्रत्येकक्षणी आव्हानांना सामोरे जाणारे ते चिमुकले रंगपंचमीनिमित्त आयोजित रंगोत्सवात मनसोक्त न्हाहून निघाले. लाल, हिरवा, पिवळा, निळया रंगाने या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य साकारण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने केला. वंचित, अनाथ व बुधवार पेठेतील देवदासींच्या मुलांनी सामाजिक प्रबोधनाच्या या रंगोत्सवात सहभागी होत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.
निमित्त होते, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळतर्फे वंचित, अनाथ व देवदासींच्या मुलांकरीता रंगपंचमीनिमित्त रंगोत्सव-सामाजिक प्रबोधनाचा या रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलींद भोई, शिरीष मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, विजय मारटकर, विशाल धनवडे, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, जमीर शेख, पृथ्वीराज येळवंडे, श्रीराम सुद्रीक, गणेश शिंदे, इम्तीयाज इनामदार, झाहीर शेख, राजेश जाधव, युवराज येळवंडे, अमर गायकवाड, अक्षय शिंदे, अतुल शिंदे, ॠषीकेश शिंदे, इम्रान तांबोळी, आकाश शिंदे, सिद्धार्थ परनारकर, शंकर गौडा आदी उपस्थित होते.
हनुमंत शिंदे म्हणाले, बुधवार पेठेतील देवदासींच्या मुलांसाठी काम करणारे स्वाधार मोहोर, वंचित विकास, कायाकल्प आणि पुणे शहरात रस्त्यावर फुगे विकणा-या तब्बल १५० चिमुकल्यांनी रंगोत्सवात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा ५ वे वर्ष होते. रंगोत्सवात सहभागी झालेले अनेक चिमुकले पहिल्यांदाच रंगपंचमी खेळत असल्याने त्यांच्यातील अनेकांच्या चेह-यावर हसू उमलले. सण-उत्सवांचा आनंद या मुलांनाही घेता यावा, याकरीता या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.