कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित कणकवली नगरपंचायत निवडणूक ६ एप्रिल रोजी होत आहे. नुकताच राज्यातील १३ जिल्ह्यातल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये कणकवलीचाही समावेश आहे. कणकवलीत एकूण १७ सदस्य संख्या आणि अध्यक्ष मिळून १८ जागांसाठी हि निवडणूक होणार आहे. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या निवडणुकीपासून प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे हि निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.
निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे.१२ ते १९ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. ७ एप्रिलला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता खर्या अर्थाने निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे.
हा निवडणूक कार्यक्रम पाहता निवडणुकीला आता केवळ एक महिन्याचाच कालावधी उरला आहे. कणकवलीबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, देवरूख आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित आजरा या नगरपंचायतीच्या तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या नगरपरिषदांच्या निवडणुकाही होणार आहेत. तर अन्य १३ जागांवर अनेक जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
९ मार्च रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करणार आहेत. १२ ते १९ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर स.११ ते दु. ३ या वेळेत भरावयाचा आहे. नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याचा कालावधी हा १२ मार्च ते १६ मार्च असून रविवार १८ मार्च रोजी नामनिर्देशनपत्र देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैध झालेली नामनिर्देशित उमेदवारांची यादी २० मार्चला प्रसिध्द होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक २६ मार्च दु. ३ वाजेपर्यंत आहे. अपील असल्यास अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसर्या दिवशी किंवा तत्पूर्वी करण्यात येईल.
निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच निवडणूक लढविणार्या अंतिम उमेदवारांची यादी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नंतरच्या लगतच्या दिवशी प्रसिध्द होणार आहे आणि ६ एप्रिलला सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ७ एप्रिलला स. १० वा.पासून मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची आचारसंहीता सोमवारपासून लागू झाली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहीता अंमलात राहणार आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्यांना करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमात म्हटले आहे.