श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ; नृत्यासह कराटे सारख्या स्पर्धांमध्ये मिळविले यश
पुणे : प्रतिकूल परिस्थितीत पुण्यामध्ये शिक्षण घेणा-या शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुरु केलेल्या जय गणेश पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणासह कला व क्रीडा प्रकारांतही चमकदार कामगिरी केली आहे. नृत्य व कराटे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे.
याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह पदाधिकारी व संस्कार वर्ग प्रशिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संस्कारभारती या संस्थेने नुकत्याच आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेत पालकत्त्व योजनेतील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी शिवतांडव हे नृत्य सादर करुन विजेतेपद पटकाविले. सुमारे ४० संघांमध्ये झालेल्या स्पर्धेत या ट्रस्टच्या संघाला विजेतेपद मिळाले असून ओंकार पायगुडे हे या संघाचे मार्गदर्शक होते.
कात्रज येथे झालेल्या एस.एम.शेतोकॉन इंडिया या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पालकत्त्व योजनेतील ३० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यापैकी ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कास्यं पदके विद्यार्थ्यांनी पटकाविली आहेत. कराटे प्रशिक्षक सचिन राऊत यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.