MAH: भारतातील पहिली पर्यटन पाणबुडी सिंधुदुर्गात; राज्याचा अर्थसंकल्पात तरतूद

March 15th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

 
 
सिंधुदुर्गात
 
कोकणकिनारपट्टटीवर जलवहातूकीने  पर्यटन व  बंदराचा व्यवसायीक विकास व्हावा याकरता आता राज्याच्या अर्थसंकल्पात ठोस तरतूद केली गेली आहे. तसेच येथील समुद्राखालील जग पाहण्यासाठी पाणबुडी करताही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासाचे नवे दालन सिंधुदुर्गात निर्माण होणार आहे. 
सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे तर अनवटच जैवविश्‍व आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील सर्व समुद्रकिनाऱ्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. यात सिंधुदुर्गातील समुद्रात दुर्मीळ अशी मत्स्यसंपत्ती असल्याचे लक्षात आले. जगात काही मोजक्‍याच ठिकाणी आढळणारे समुद्रीवड, समुद्रीगवत सिंधुदुर्गातील समुद्राच्या पोटात अनेक ठिकाणी आहे. सिंधुदुर्गातील किनारा भागात आतापर्यंत गोळा केलेल्या सर्वेक्षणावरून असे आढळले आहे की, सागरी प्राण्यांचे १९८ प्रकार या भागात आढळले. त्यात स्पंज, समुद्री फूल, समुद्री पंखा, प्रवाळ, विविध प्रकारचे मासे, खेकडे, कासव, जिवंत शेवाळ यांचा समावेश आहे. 
सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पॉट आहेत. यात निवती रॉक सर्वाधिक आकर्षण ठरेल असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची दोन ते तीन बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारले होते. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशामध्ये राहील. कालांतराने त्सुनामीमुळे हे दीपगृह उद्‌ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षापूर्वी स्वीफ्ट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जेवढा गूढ आणि सुंदर दिसतो, त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर तेथील समुद्रविश्‍व आहे.
निवती रॉक परिसरात वर दिसणारे खडक म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या खालचा भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोहोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत.
या ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी पर्यटनासाठी वापरण्याचा भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. अमेरिका, बाली, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये असे प्रयोग झाले आहेत. आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये पाणबुडी पर्यटनासाठी वापरल्याचे सांगितले जाते; पण ती पाणबुडी नसून बोटच म्हणावी लागेल; कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरच तरंगते. स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आत जाता येऊ शकते; मात्र स्कूबा डायव्हिंगवर पर्यटकाच्या क्षमता प्रभाव टाकतात. स्कूबच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार १२ वर्षाखालील मुलांना याचा वापर करता येत नाही. वृद्ध, उच्चदाबाचे रुग्ण, महिला याही स्कूबाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. याऐवजी पारदर्शक पाणबुडीमधून सर्व वयोगटातील पर्यटकांना समुद्राच्या पोटात जाऊन हे विश्‍व अनुभवता येणार आहे. 
 
पाणबुडीमुले काय शक्य आहे 
 
•        पाणबुडी प्रकल्पात वेंगुर्ले ते निवती रॉकपर्यंतचे क्षेत्र विकास टप्प्यात
•       प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च-४९ कोटी
•       बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची पर्यटक क्षमता ३०
•       प्रकल्पासाठी आवश्‍यक गोष्टी – मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का
•       प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी – ८ ते ९ महिने
•       निवती रॉक परिसरातील सागरी विश्‍व – विविध प्रकारचे रंगीत मासे, दुर्मीळ, वैशिष्ट्यपूर्ण सागरी वनस्पती, समुद्राच्या आतील गुहा, देखणा खडकाळ भाग
 
कसा मिळणार आनंद ?
 
पाणबुडी पर्यटनाची सुरुवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज आधुनिक बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाणार आहे. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून या प्रवासात डॉल्फीन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील देखणे नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घेऊन येईल. यानंतर पाणबुडीतून समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे आतील वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय आतील प्रवाळे, शैवाल व इतर वनस्पती  जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions