पुणे
– अभिनेता आनंद इंगळे यांचे मत
– बीएमसीसीत सांस्कृतिक पुरस्कार वितरण
पुरुषोत्तम, फिरोदिया आदी स्पर्धांतील यश महत्वाचे असते, परंतु ते तत्कालिन असते. आज त्याचा उपयोग नसतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्यातील कला गुण पुन्हा पुन्हा सिध्द करावे लागतात. अभ्यास, खेळ, उद्योग, व्यवसाय आदी जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये कला गुणांचा उपयोग झाला पाहिजे, असे मत अभिनेता आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बीएमसीसी सांस्कृतिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे गौरव करताना श्री. इंगळे बोलत होते. महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे, विद्यार्थी प्रतिनिधी आदीत्य पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. इंगळे पुढे म्हणाले, ‘यश हे एकत्रित परिणाम आहे. मी काय विचार मांडतो किंवा मी काय योगदान देतो ते महत्वाचे असते. कष्ट म्हणजे संघर्ष नाही. संघर्ष केला हे सांगणेही योग्य नाही. तुमच्या कालच्या कामापेक्षा आजचे काम कसे चांगले आहे हे जास्त महत्वाचे असते.’
आर्थिक, मनुष्यबळ, स्पर्धेत टिकणे, जे आहे त्याचा यश मिळविण्यासाठी अधिक चांगला उपयोग करण्याचे व्यवस्थापन करुन संख्यात्मक आणि गुणात्मक यश सांस्कृतिक विभागाने विशेष कामगिरी केल्याचे विद्यार्थ्यांनी केल्याचे गौरवोद्गार प्राचार्य रावळ यांनी काढले.
आदीत्य पवार, ऋषि मनोहर, चिन्मय देव, तुषार देशपांडे या विद्यार्थ्यांना ‘सरस्वती प्रसाद’ पुरस्काराने गौरविण्यात आले. फिरोदिया प्रथम, पुरुषोत्तम करंडक तृतीय, रंसंगीत करंडक द्वितीय, रोटरी करंडक द्वितीय, भरत करंडक द्वितीय, सवाई द्वितीय, अभिनय महाकरंडक प्रथम आणि अक्षर करंडक प्रथम क्रमांक मिळविणार्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
मंदार नेने, पूर्वा लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशीश पुराणीक यांनी प्रास्ताविक भाषण केले. अभिषेक माने यांनी परिचय करुन दिला. आदीत्य पवार यांनी आभार मानले.