पुणे
चांगला गुरू नशिबाने मिळतो असे म्हणतात, परंतु प्रत्येक गुरूला ही असे वाटते की आपला शिष्य चांगला असावा. चांगला शिष्य होणे हे अत्यंत कठीण असते. संगीताच्या जितक्या खोलीत जाणार तितकी त्याची उंची वाढत असते. ती जाण फक्त त्याच्या साधकालाच असते. शास्त्रीय संगीतावर कितीही आक्रमण होत असेल तरी देखील त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. नवीन तरुण कलाकार या क्षेत्रात येत आहेत, त्याचा मला अभिमान वाटतो, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ सतार वादक उ.उस्मान खान यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ सतार वादक उ.उस्मान खान साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नगरसेवक हेमंत रासने, मंडळाचे अध्यक्ष पीयुष शहा आदी उपस्थित होते.
माधवी वैद्य म्हणाल्या, हल्ली प्रसिध्दीच्या काळात प्रत्येकाला झटपट प्रसिध्दी हवी आहे. प्रसिध्दी मिळणे देखील सोपे झाले आहे. परंतु ही सोपी झालेली प्रसिध्दी खरी आहे की खोटी याचे तारतम्य राखून जो माणूस आपले कर्तव्य करतो तो पुढे जातो आणि मोठा कलावंत होतो. त्यामुळे पुरस्कारार्थीच्या फक्त पुरस्काराकडे न पाहता त्यामागील त्याने केलेले कष्ट देखील पाहावे.
पुरस्काराला उत्तर देताना पंडित संजीव अभ्यंकर म्हणाले, नावीन्याचा ध्यास हा स्वभावच असला पाहिजे आणि नसेल तर वैचारिकतेतून तसा बनविला पाहिजे. अशा प्रकारचे पुरस्कार हे कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. असेही त्यांनी सांगितले.