पुणे
पैशाप्रमाणे काही प्रमाणात रक्ताच्या बँका असल्या, तरीही रक्ताच्या बँकांमध्ये होणारा रक्तसंचय हा गरजेपेक्षा अतिशय कमी प्रमाणात आहे. भारतात रक्ताची चणचण मोठया प्रमाणात असूनही रक्तदाते पुढे येत नाहीत. त्यामुळेच झंवर परिवारातर्फे रामेश्वर झंवर आणि पुष्पाबाई झंवर यांच्या स्मरणार्थ रविवार, दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० यावेळेत शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू कार्यालय येथे रक्तदान महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वाधिक वेळा रक्तदान करणा-या महिलांना आस्वाद जीवनदान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक शाम झंवर यांनी दिली.
कार्यक्रमाला पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड, स्पर्श इन्फोसिसच्या टिना टिट्टी यावेळी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे. सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या महिला रक्तदात्यांचा सन्मान सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मीती फाऊंडेशन, अलायन्स क्लब आॅफ पुणे, बोल्ड अँड एलिगंट, लायन्स क्लब आॅफ पुणे खडकी, दात्री फाऊंडेशन, श्री बालाजी भजनी मंडळ कसबा पेठ, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ युवा समिती, श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था, राधाकृष्ण युवक मंडळ या संस्थांचा उपक्रमात सक्रिय सहभाग असणार आहे.
गणेश झंवर म्हणाले, अॅनिमीयामुक्त भारत व सशक्त भारत करण्याच्या हेतून जास्तीत जास्त रक्तदात्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने अनेक रक्तदाते रक्तदान करु शकत नाहीत. भारतात केवळ १५ टक्के महिला रक्तदान करतात. त्यामुळे महिला रक्तदाते वाढविणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येत आहे.