पुणे
महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचा पुढाकार ; महाराष्ट्रातील १५ हून अधिक संस्थांचा सहभाग
महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यात प्रथमच सामाजिक संस्था, कार्यकर्ते व समाजकार्य क्षेत्रातील विद्यार्थी यांच्यासाठी समाजकार्य-नोकरी महोत्सव पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. समाजकार्यासोबतच कार्यकर्त्यांची गुणवत्ता वाढ आणि आर्थिक विकासासाठी यामाध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. महोत्सवाचे उद््घाटन रविवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक शेखर मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विजय वरुडकर, महोत्सवाचे प्रकल्प संचालक प्रशांत खांडे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, नागपूर अशा विविध भागांतून अनेकजण महोत्सवात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे समाजकार्य विभागप्रमुख डॉ.दीपक वालोरकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ.प्रकाश यादव, भारती विद्यापीठाचे डॉ.विजय कुलकर्णी, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अखिल रयत सेवक क्रांतीकारी संघ ही संस्था देखील संयोजनात सहभागी झाली आहे.
प्रशांत खांडे म्हणाले, सामाजिक विषयांवर काम करणा-या संस्था व व्यक्तींच्या कार्य गुणवत्तेत वाढ व्हावी. तसेच सामाजिक कार्यासह त्यांचाही आर्थिक विकास व्हावा, हा यामागील मुख्य हेतू आहे. सामाजिक क्षेत्रातील बीएसडब्लू, एमएसडब्लू, एम.फील, पीएचडी या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावा, याकरीता यामाध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. महोत्सवाकरीता विनामूल्य प्रवेश असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. सहभागासाठी ८४४६७६३९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
* महाराष्ट्रातील तब्बल १५ हून अधिक सामाजिक संस्थांचा सहभाग
महाराष्ट्रातील क्लिन गार्बेज फाऊंडेशन, सुमेरु सोशल रिसर्च, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, रिलीफ फाऊंडेशन, आर्ट आॅफ लिव्हिंग, रोस्ट्रम इंडिया, सिद्धी फाऊंडेशन, थंब क्रिएटिव्ह ट्रस्ट, स्टेप अप इंडिया फाऊंडेशन, केश सिता मेमोरियल फाऊंडेशन ट्रस्ट, स्वानंद जनकल्याण, ल्युपीन ह्युमन वेल्फेअर रिसर्च फाऊंडेशन, एर्न्व्हार्नमेंट क्लब आॅफ इंडिया, एजे फाऊंडेशन, विश्वशक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशन, आयडिया फाऊंडेशन, गीताई व्ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट आदी सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर काम करण्याकरीता सामाजिक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे या संस्थांचे प्रतिनिधी महोत्सवास उपस्थित राहणार असून उमेदवारांची निवड करणार आहेत.