पुणे
नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर यांच्या १११ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
सैनिकांची आठवण युद्ध किंवा पुरस्काराच्या वेळीच होते. सैन्यामध्ये असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांकडे समाज अपंग म्हणूनच पाहतो. परंतु त्यांच्याकडे अपंग म्हणून पाहू नका, तर त्यांचा शूरवीर म्हणून सन्मान करा. सैनिक हा कोणत्याही एका समाजाचा नाही, तर तो देशाचा अभिमान असतो. सैनिकाचे कार्य समाजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायला हवे, हाच आपण त्यांना दिलेला बहुमान असेल, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी केले.
भारताचे पहिले पॅराआॅलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेठकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्काराबद्दल नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहरतर्फे पेठकर यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे प्रांताध्यक्ष सुधीर पिसे, शाहीर हेमंत मावळे , विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर, शहराध्यक्ष संदीप लचके, बापू बोत्रे, अर्जुन पेठकर, रामभाऊ मेटे, दिगंबर क्षिरसागर, वसंत खुर्द उपस्थित होते.
मुरलीकांत पेठकर म्हणाले, धावपटू मिल्खा सिंग नंतर मला पद्मश्री मिळाला याचा मला आनंद आहे. सैनिकांमुळेच आज देश सशक्त आहे. पाठीच्या कण्यात बंदुकीची गोळी शिल्लक असताना देखील १९७२ मध्ये जर्मनी मध्ये झालेल्या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळविले. जिद्द ठेवली की अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. त्यामुळे खेळाडंूनी देखील आॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संदीप लचके यांनी प्रास्ताविक केले.